“अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे”, सचिन वाझेंचा आरोप; फडणवीसांना पत्र
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे वसुली कांड गाजले होते त्याच बाबतीत तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने (Sachin Waze) मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Dismissed Mumbai police officer and accused in Rs 100 crore extortion case, Sachin Waze says, “Whatever has happened, the proof is there. The money used to go through his (Anil Deshmukh) PA, CBI has the proof and I have also written a letter to… pic.twitter.com/Y3MidoPDME
— ANI (@ANI) August 3, 2024
मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख पत्रकार परिषदा घेऊन देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला होता. यासाठी फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस माझ्याकडे पाठवला होता असेही देशमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट
या संदर्भात सचिन वाझेने देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अन्य काही नेत्यांची नावं आहेत. अद्याप हे पत्र समोर आलेलं नाही. सचिन वाझेंच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सर्व प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच येऊन कशी थांबतात? सर्व प्रकरणांचे केंद्रबिंदू तेच कसे असतात? असे सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले आहेत.