दाऊदच्या 15 हजारांच्या प्रॉपर्टीसाठी वकिलाने मोजले 2 कोटी; रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी विकत घेतली आहे.
यानंतर श्रीवास्तव म्हणाले की काही लोक मला विचारतात की काही हजार रुपयांच्या मालमत्तेसाठी दोन कोटी रुपयांची बोली का लावली. याचं उत्तर म्हणजे मी सनातनी हिंदू आहे. मी माझ्या गुरुजींच्या मार्गदर्शनानुसारच काम करतो. मालमत्तेचा सर्व्हे नंबर आहे. यासाठी जी रक्कम आहे त्याची मोजणी आहे. यातील एक अंकगणित माझ्या बाजूने आहे. त्यामुळे मी ही जागा खरेदी केली. या जागेवर आता एक शाळा सुरू करण्याचा माझा विचार आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
दाऊदच्या हस्तकाशी गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंनी दाखवले सभागृहात फोटो
श्रीवास्तव यांनी याआधी सन 2020 मध्ये दाऊदचा एक वाडाही विकत घेतला होता. या ठिकाणी सनातनड धर्मशाळा ट्रस्टची स्थापना केली. आता नोंदणी झाल्यानंतर नव्या मालमत्तेच्या ठिकाणीही धर्माशाळा सुरू करण्याचा विचार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. श्रीवास्तव यांनी खरेदी केलेल्या दोन मालमत्तांपैकी एका मालमत्तेसाठी चार जणांनी बोली लावली होती. दुसऱ्या मालमत्तेसाठी तीन जणांनी बोली लावली होती. उर्वरित दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. या चारही मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके या गावातील आहेत.
दाऊद इब्राहिमला मोठा दणका; मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव
दाऊदचे बालपण येथेच गेले होते. अनेक वर्षांपूर्वी तपास यंत्रणांनी या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या. 21 नोव्हेंबर रोजी मालमत्तांच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. शुक्रवारी हा लिलाव स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन कायद्यांतर्गत (SAFEMA) करण्यात आला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात काही वर्षांपूर्वी बंगले आणि आंब्याच्या बागांसह एकूण चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
हॉटेल 2018 मध्ये विकले गेले
दाऊदच्या 11 मालमत्तेचा पहिल्यांदा 2000 साली आयकर विभागाने लिलाव केला होता, मात्र त्यानंतर कोणीही लिलाव प्रक्रियेत आले नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत दाऊदच्या अनेक मालमत्ता विकण्यात आणि खरेदीदारांना ताबा मिळवून देण्यात तपास यंत्रणांना यश आले.
यापूर्वी लिलाव करण्यात आलेल्या दाऊदच्या मालमत्तेत एक रेस्टॉरंट 4.53 कोटी रुपयांना विकले गेले, सहा फ्लॅट 3.53 कोटी रुपयांना आणि गेस्ट हाऊस 3.52 कोटी रुपयांना विकले गेले होते. यापूर्वी दाऊदच्या मालमत्ता विकत घेतलेल्या काही लोकांना डी कंपनीकडून धमक्याही आल्या होत्या.