नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 80 जणांना अटक, ‘या’ भागात भागांमध्ये संचारबंदी लागू

Nagpur Violence : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी सोमवारी 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद (VHP) , बजरंग दल (Bajrang Dal) यांच्याकडून नागपूर (Nagpur) शहरातील गणेशपेठ आणि महाल परिसरात आंदोलन करण्यात आले होते मात्र त्यानंतर दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर आता नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करुन 80 जणांना अटक केली आहे. तर याच बरोबर परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आतापर्यंत 1800 सोशल मिडिया अकाऊंटसची तपासणी करण्यात आली आहे.
या भागात संचारबंदी लागू
सध्या परिस्थिती नियत्रंणात असून गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. तसेच संचारबंदी लागू करण्यात आल्याने या भागात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ आणि महाल परिसरात 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळली आणि याचे काही फोटो सोशल मीडिायावर व्हायरल करण्यात आले. तर रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.
तर चिटणीस पार्क चौकाकडून रात्री आठच्या सुमारास एक गट आला आणि या गटाकडून हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. तर साडेआठच्या सुमारास दोन्ही गटांकडून नारेबाजी करण्यात आली आणि त्यामुळे वाद चिघळला. यानंतर पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
नागपूर का पेटलं? ‘कबरीचा वाद, पोलिसांवर दगडफेक’ काय-काय घडलं, वाचा सविस्तर…
दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. रात्री 8.40 पासून वाजतापासून दंगल उसळली आणि पोलिसांनी रात्री नऊपासून कोम्बींग ऑपरेशनकरून आतापर्यंत 80 जणांना अटक केली आहे.