Samrudhi Highway Accident : जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो; पवारांची बोचरी टीका
Sharad Pawar On Buldhana Bus Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातावर भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात हे गेले काही महिने बघायला मिळतं. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात.जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ( Sharad Pawar On Devendra Fadanvis )
समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नागपूर-मुंबई अशी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. सध्या नागपूर ते शिर्डी या मार्गावर हा हायवे खुला करण्यात आला असून या महामार्गावर सातत्याने अपघात होताना दिसत आहे. आज या महामार्गावर बुलढाणा येथे खासगी ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
यावर शरद पवार पुढे म्हणाले की, अपघाताचे कारण रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे.
ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, ज्यांनी रस्ता तयार केला त्यांना लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले, असे पवार म्हणाले. तसेच 5 लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी आणि अपघाताची कारणे सांगावी, असेही ते म्हणाले. तसेच या रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. हा सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे याचा नीट अभ्यास होणं गरजेचं आहे, असे त्यांनी सांगितले.
Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वर्षपुर्तीच्या विषयावरदेखील भाष्य केले. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. राज्यात होत असलेले महिलांवरील हल्ले, कोयता गँग ही राज्य सरकारची देणगी असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही, असे टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच महाराष्ट्रात गुंतवणूकदार येत आहेत अशा बातम्या येतात, आपण महाराष्ट्रील प्रकल्प बाहेर जात आहेत, असे ते म्हणाले.