मिठाचा खडा पडलाच! राम शिंदेंच्या सत्काराला विखेंची दांडी; नगरमध्ये एकीचं बळ दिसलंच नाही
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना बळ दिलं. विधानपरिषदेच्या सभापतिपदी संधी दिली. एका अर्थाने राम शिंदेंच राजकीय पुनर्वसनच केलं. राम शिंदेंच्या रुपाने अहिल्यानगर जिल्ह्याला मानाचं पद मिळालं. म्हणून सर्वपक्षीयांनी एकत्र येत त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. आज हा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. परंतु, याही कार्यक्रमात मिठाचा खडा पडलाच. मंत्री विखे आणि राम शिंदे यांच्यात फारसं राजकीय सख्य नाही असं बोललं जातं. याची प्रचिती या कार्यक्रमातून आली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. इतकेच नाही तर भाजपाच्या अन्य आमदारांसह मित्र पक्षांच्या आमदारांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली.
राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाची आठ दिवसांपासून तयारी सुरु होती. भाजपकडून सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासंबंधी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषदेतही आघाडीच्या पदधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळे मुख्य कार्यक्रमाला सर्व आमदार मंत्री व खासदार उपस्थित राहणार का याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र या सत्कार सोहळ्याला लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार मात्र आवर्जून उपस्थित होते.
सभापती झाले पण विधानसभेच्या पराभवाची सल कायम; राम शिंदेंच पराभवावर मोठं वक्तव्य, म्हणाले..
विखेंची अनुपस्थिती, चर्चांना उधाण
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी केवळ एका आमदाराने उपस्थिती दर्शवली. धक्कादायक बाब म्हणजे महायुतीमधील मित्र पक्षांनी या कार्यक्रमाला दांडी मारली तसेच भाजपच्या आमदारांनी देखील याकडे चक्क पाठ फिरवली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. यामुळे महायुतीमधील तसेच भाजपमधील अंतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा समोर आली.
दरम्यान, राम शिंदे व विखे कुटुंबामधील शीतयुद्ध हे सर्व नगर जिल्ह्याला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उमेदवारीवरुन विखे व शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा विखे व शिंदे यांच्यामधील संघर्ष समोर आला. मात्र असे असले तरी शिंदे यांचा सत्कार कार्यक्रम हा कोणा एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय कार्यक्रम होता यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते मात्र असे झाल्याचे दिसले नाही. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने सर्वपक्षीय सत्कार सोहळा हा कार्यक्रम सपशेल फेल गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
राम शिंदेंचा शनिवारी सर्वपक्षीयांकडून सत्कार; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची उपस्थिती