सभापती झाले पण विधानसभेच्या पराभवाची सल कायम; राम शिंदेंच पराभवावर मोठं वक्तव्य, म्हणाले…
अल्पशा मताने पराभव झाल्यानंतर नाराजी असणे साहजिकच आहे. मात्र, दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी आणि महायुती ही

Ram Shinde on Assembly Defeat : विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला त्याची सल आजही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मनात कायम असल्याचं दिसत. ते वारंवार त्या पराभवावर भाष्य करत असतात. (Ram Shinde ) या निवडणुकीत आपल्यासोबत दगा फटका झाला अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. तसंच, ही निवडणूक पूर्वनियोजित नुरा कुस्ती होती. नुरा कुस्ती असल्यामुळे मला लक्षात आले नाही. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर ही नुरा कुस्ती आहे, असे वारंवार सांगण्यात आले. भविष्यात या नुरा कुस्तीची काळजी घेऊन २०२९ च्या निवडणूकीकडे मी पाहतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!
अल्पशा मताने पराभव झाल्यानंतर नाराजी असणे साहजिकच आहे. मात्र, दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी आणि महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली. विचारधारेला आणि वारसाला हरताळ फासणारी गोष्ट होती, अशी खेदजनक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. तसंच, रोहित पवारांनी माझा सत्कार केला आहे. परंतु, सत्कार करते वेळेस मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी येऊन सत्कार केला आहे. मात्र मी निवडणुकीत जिंकलो नाही. परंतु, मी सर्वोच्च पदावर गेलो आहे. आणि तुमचं मन सांगतय की, माझा सत्कार करायचा. तुमचा सत्कार घ्यायला माझी हरकत नाही. मात्र, बारामतीतील तुमच्या घरी सत्कार केला पाहिजे. तरच, संस्कृती जोपासली असं म्हणता येईल असा टोलाही शिंदेनी यावेळी लगावला.
मोठे संख्याबळ
मंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. ४३ क्षमता असताना ४२ मंत्री झाले आहेत. कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये मोठे संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे सर्वांनाच दालन आणि निवासस्थान देणं कठीण आहे. आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या माध्यमातून ज्यांची जशी मागणी होती. तशी ज्येष्ठतेनुसार दालन आणि निवासस्थाने उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांना कुणाला निवासस्थाने मिळाली नसतील. त्यांना सरकार उपलब्ध करून देईल. मला असं वाटतं की याबाबत कोणाचीही नाराजी नाही. असंही शिंदे म्हणाले आहेत.
बीडमध्ये झालेली घटना दुर्दैवी
बीडमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील बरेच आरोपी पकडले आहेत. निष्क्रिय अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. एसपीची बदली केली आहे. उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. सरकारने जाहीर केले आहे की, कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी भूमिका घेतली आहे. असे शिंदे म्हणाले.