राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!

राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!

Ram Shinde : ‘खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर तुम्ही आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास मला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे नूतन सभापती प्रा. राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. चौंडी गावचे सरपंच ते थेट सभापती.. राजकारणात असा मोठा टप्पा गाठणारे राम शिंदे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते. फडणवीसांचे निकटवर्तीय ही त्यांची वेगळी ओळख. विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने त्यांना ताकद दिली. विधानपरिषदेवर घेतलं. सभापती केलं. या माध्यामतून भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी कोणती गणितं साधली याची माहिती घेऊ या..

विधानपरिषदेच्या सभापतिपदाचा कार्यभार राम शिंदेंनी गुरुवारी स्वीकारला. शिंदे गटाने या पदावर काही काळ दावा केला होता. शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे सभापती होतील असेही सांगितले जात होते. परंतु या फक्त चर्चाच ठरल्या. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही उमेदवार दिला नाही त्यामुळे राम शिंदे एकमताने सभापती पदावर विराजमान झाले. आता भाजपने शिंदे यांना सभापती पद देऊन नक्की काय साधलं याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिंदेंची कडवी झुंज अपयशी; मात्र, पवारांना घाम फोडला..

शिंदेंना बळ, रोहित पवारांना इशारा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी सलग दुसऱ्यांदा राम शिंदे यांचा पराभव केला. परंतु यावेळची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. राम शिंदे यांचा फक्त 1243 मतांनी पराभव झाला. राम शिंदे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांना ताकद द्यायची हे पक्षाने ठरवलं होतं.

निवडणुकीच्या आधीच त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही काळ नगर जिल्ह्याचे प्रभारी राहिले आहेत. त्यांना येथील राजकारणाचे बारकावे माहीत आहेत. शुगर लॉबीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात त्यांनी मूळ भाजपचा मोहरा असलेले शिंदे यांना जपलं. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना थेट सभापतिपदाची संधी देण्यात आली. ओबीसी चेहऱ्याला भाजपमध्ये नेहमीच प्राधान्य देण्यात येते असे भाजप नेते वारंवार सांगतात त्यांच्या याच वक्तव्यांची प्रचिती शिंदे यांच्या निवडीतून आली.

पडळकर आक्रमक पण शिंदे मुरब्बी

खरं तर आमदार गोपीचंद पडळकर हे फडणविसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मैदानात उतरून नेहमीच पक्षाची बाजू सावरून घेतात. त्यांनाही आधी विधान परिषदेत संधी देण्यात आली. नंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत पडळकर विजयी झाले. पडळकर सध्या भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. तर राम शिंदे त्यांच्या तुलनेत मुरलेले आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना प्राधान्य दिल्याचं सांगितलं जात आहे.

राम शिंदे सर त्यांना क्लास कसा.. फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा

विधान परिषदेचं पद राजकीय नाही परंतु कार्यकर्त्यांची कामे आणि अडचणी दूर करण्यास उपयुक्त आहे. जिल्ह्यात जे कार्यकर्ते आणि भाजप समर्थक आहेत त्यांना आधार देण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं. तसेच यंदा जिल्ह्याला फक्त एकच मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे काहीशी नाराजी आहे. आता शिंदेंच्या सभापतिपदाच्या माध्यमातून ही नाराजी काहीशी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय.

जिल्ह्यात साधला समतोल

जिल्ह्यातील 12 पैकी 10 मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिर्डी मतदारसंघातून स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले आहेत. जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यशैलीचं कौतुक होत आहे. परंतु, शिंदे आणि विखे यांच्यात फारसं सख्य नाही हे याआधीही अनेक वेळा दिसून आलं आहे. हा इतिहास लक्षात घेतला तर शिंदे यांना ताकद देऊन फडणवीसांनी पक्षात बाहेरून आलेले सहकारातील नेते आणि मूळ भाजप असा समतोल साधला आहे.

फरांदेंनंतर शिंदेंना संधी

भाजपने याआधी ना. स. फरांदे यांना 1998 ते 2004 या काळात विधान परिषदेच्या सभापतिपदाची संधी दिली होती. विधानपरिषदेतील भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी फरांदे यांचा उल्लेख केला होता. आता यावेळी पुन्हा भाजपने राम शिंदे यांना ही संधी दिली आहे. यावेळी फरक इतकाच आहे की यंदा भाजप मोठा भाऊ आहे तर शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube