राम शिंदे सर त्यांना क्लास कसा…; फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा

राम शिंदे सर त्यांना क्लास कसा…; फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा

Devendra Fadnavis on Ram Shinde : ‘खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. चांगले पायंडे तयार करणं ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. ती तर आपण पार पाडालचं. विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर तुम्ही आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांची आज विधानपरिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड करण्यात आली. विरोधी महाविकास आघाडीने या पदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे निवडणूक झाली नाही. राम शिंदे यांची एकमताने सभापती पदावर निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘या सभागृहाने एकमताने प्रा. राम शिंदे सभापतीपदी निवड केली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो. जरी निवडणुकीची पद्धत असली तरी सभापतीची एकमताने निवड करावी या परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने देखील घेतला त्यामुळे मी विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो. खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. याआधी देखील प्रा. ना. स. फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला.’

राजकारण फिरलं! सभापतीपदासाठी राम शिंदे कन्फर्म, अर्ज भरणार; शिंदेसेनेत अस्वस्थता

‘रामराजे निंबाळकर तर वकिलही होते आणि प्रोफेसरही होते. मला विश्वास आहे की आपणही तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचं कामकाज चालवाल याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही.’

‘शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो. शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो आणि शिकवतही असतो. मला विश्वास आहे की आता आपण या पदावर बसल्यावर या सभागृहातून आपण अनेक गोष्टी ग्रहण कराल. चांगले पायंडे तयार करणं ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. ती तर आपण पार पाडालचं. विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर तुम्ही आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला आहे.’

‘ना. स. फरांदे सर आणि तुमच्यात (राम शिंदे) एक साम्य आहे ते म्हणजे तुम्ही दोघेही अहिल्यानगरचे आहात. एकप्रकारे विचारांचे वारसदार म्हणून तुम्ही काम करत आहात. सरपंच पदापासून सभागृहातील सर्वोच्च पदापर्यंतची आपली वाटचाल ही अतिशय प्रेरणादायी आहे. चौंडी गावचे सरपंच म्हणून राम शिंदे यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधीमंडळातून जनतेला न्याय देणारच; राम शिंदेंनी विधानपरिषदेचा हेडमास्तर होण्याआधीच सांगितलं

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube