‘पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या’, खासदार लंकेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke News : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे (Heavy Rain in Ahliyanagar) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खासदार लंके यांनी पत्रात नमूद केले आहे की तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.
पुण्याला आज रेड अलर्ट! मुसळधार पावसाने झोडपले; चिंचवड, पाषाणमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस!
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे त्यांना तत्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे खासदार निलेश लंके यांनी पत्रात म्हटले आहे.
विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस; अहिल्यानगरला 19 ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’