लोकसभा रणशिंग! अहमदनगर दक्षिणचं ठरलं पण उत्तरेचं काय?

लोकसभा रणशिंग! अहमदनगर दक्षिणचं ठरलं पण उत्तरेचं काय?

प्रविण सुरवसे

Ahmednagar Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती मात्र या मतदार संघातील कोणतेही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. शिर्डीच्या जागेसाठी ठाकरे गट, शिवसेना, काँग्रेस, भाजप, रिपाईसह मनसे देखील स्पर्धेत आहे. मात्र दोन्ही गटाकडून अद्याप आपले उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही आहे. यामुळे सध्या नगर जिल्ह्यातील परिस्थिती पहिली तर दक्षिणेचे फायनल झाले आहे मात्र उत्तरेत परिस्थिती काहीशी वेगळी आहे. आरक्षित असलेल्या या जागेसाठी अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत. यामुळे या जागेवरील उमेदवाराबाबत तेढही कायम आहे.

कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मेष राशीचा आजचा दिवस

दक्षिणेत विखे विरुद्ध लंके…
नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांसह नेतेमंडळींच्या हालचालींना आता वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिणेमध्ये उमेदवार कोण असणार यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान नगर दक्षिणमध्ये भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे निश्चित आहे, मात्र उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झाले नव्हते. अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली व सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सध्यातरी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा आहे. लंके यांचा पक्षप्रवेश झाला नाही तसेच त्यांच्या नावाची देखील घोषणा झाली नाही मात्र नगर दक्षिणेत लंके विरुद्ध विखे असाच सामना रंगणार हे मात्र जवळपास निश्चित झाले आहे.

शिर्डीत उमेदवारांची घोषणा नाहीच…
दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदार संघ हा आरक्षित आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गट व शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात येणार आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव चर्चेत आहे तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांचे नाव समोर येत आहे. मात्र दोन्ही नावांना पक्षातूनच विरोध होत आहे. महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाचे प्राबल्य अधिक आहे. मात्र वाकचौरेंना विरोध होऊ लागल्याने या जागेची काँग्रेस देखील मागणी करत आहे. दलबदलू वाकचौरेंपेक्षा माविआने हि जागा काँग्रेससाठी सोडावी अशी मागणी देखील होत आहे. काँग्रेससाठी जागा मिळाली तर उत्कर्षा रुपवते या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले.

उच्च न्यायालयाचा सरकारला धक्का, ८ हजार कोटींची आपत्कालिन रूग्णसेवेची निविदा रद्द

तर शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदाशिव लोखंडे यांच्यावर नाराजीचे ढग घोंघावू लागल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. महायुतीकडून या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जाऊ लागला असला तरी विद्यामान खासदारांवर असलेली नाराजी यामुळे या जागेवर भाजप देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून नितीन उदमले यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपने हि जागा रिपाईसाठी सोडावी अशी मागणी आठवले गटाकडून करण्यात येत आहे. रामदास आठवले या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपकडून एके एका जागेसाठी बारकाईने चाचपणी सुरु आहे. यामुळे या ठिकाणी देखील नगर दक्षिण सारखेच महायुतीविरूदध महाविकास आघाडी अशी फाईट होणार. मात्र उमेदवार कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
नगर दक्षिण असो वा शिर्डी लोकसभा मतदार संघ या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने आता शिर्डीमध्ये देखील लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता आहे. तसेच माविआ शिर्डीत कोणाला उमेदवारी देणार यावरून देखील महायुतीचा उमेदवार ठरविला जाणार असे देखील चर्चा राजकारणात रंगत आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये झालेल्या राजकीय भूकंपांनंतर लोकसभेची गणित देखील बदलली आहे. यामुळे दोन्ही गटाकडून कोणाला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज