लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?

लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?

प्रविण सुरवसे
लेट्सअप प्रतिनिधी

Ahmednagar News : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लवकरच जाहीर होणार असून मात्र त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. यातच राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे काही गणित देखील बदललेली आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार? याबाबत देखील बहुतांश चित्र हे स्पष्ट झाले आहे. शिर्डी लोकसभेवर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दावा केला जातो आहे. तर नगर दक्षिणेची जागा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडे असणार आहे.

दरम्यान, दोन्ही जागा मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसकडून देखील होत आहे मात्र शिर्डी हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो तर नगर दक्षिण यावर शरद पवार यांची मजबूत पकड आहे. दरम्यान दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवारांची जाहीर घोषणा करण्यात आली नाही असली तरी मात्र माविआचे जिल्ह्यातील लोकसभेची रणनीती कशी असणार? यावर अनेकदा चर्चा झाल्याने लवकरच या जागांवरचे उमेदवार देखील घोषित होतील.

मविआची चार तासांची बैठक संपली, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आंबेडकरांकडून आमचा अपेक्षाभंग…’

नगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा व शिर्डी लोकसभा यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिर्डी लोकसभा हा शिवसेनेचा (ठाकरे गटाचा) बालेकिल्ला समजला जातो. या जागेवर गेली दोन टर्म हे शिवसेनेचे खासदार हे निवडून आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपामुळे राजकीय गणित बिघडली आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. दरम्यान विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. यामुळे लोखंडे हे शिंदे गटाचे उमेदवार मानले जात आहे. तर शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने देखील मोट बांधली आहे.

शिर्डीसाठी उद्धव ठाकरे खुद्द रिंगणात :
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डीसाठी खुद्द उद्धव ठाकरे हे रणांगणात उतरले आहे. ठाकरे यांनी दोनदा शिर्डी दौरा केला. यावेळी लोकसभेच्या अनुषंगाने त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे तिकीट फायनल असल्याचे समजते आहे. जिल्ह्यात झालेल्या ठाकरेंच्या प्रत्येक सभेच्या मंचावर वाकचौरे हे दिसून आले. यामुळे ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी पक्की समजली जाते. मात्र दलबदलूंना संधी देण्यात येऊ नये अशी मागणी करत शिर्डीची जागा काँग्रेससाठी सोडावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी केली आहे.

नगर दक्षिण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला :
दुसरीकडे नगर दक्षिणेचा विचार केला असता या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर चार आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केलं. तर उर्वरित दोन आमदारांनी शरद पवार गटात राहणे पसंत केले. दरम्यान, नगर दक्षिणेवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगितला आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवार कोण असणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी या जागेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव देखील चर्चेत होते. तसेच पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवणार असे देखील तनपुरे यांनी स्पष्ट केले होते. तर काँग्रेसकडून खुद्द माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या जागेवरून निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती.

लंके तुतारी फुंकणार का?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभा लढवण्याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र शरद पवारांचा शिलेदार नेमका कोण असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. नुकतेच आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात खसदार अमोल कोल्हे यांनी मंचावरूनच लंके यांना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले. लंके यांनी राष्ट्रवादीची तुतारी नगर दक्षिणेत वाजवावी असे सूचक विधान करत त्यांना आमंत्रण दिले. निलेश लंके हे शरद पवार गटाचे दक्षिणेचे उमेदवार असतील अशी चर्चा देखील जिल्ह्यात सुरु आहे. मात्र अद्याप लंके यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही आहे. दक्षिणेसाठी तगडा उमेदवार दिला जाईल असे सूतोवाच राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहे. नेमकं राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र लंके अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्याकडून तुतारी फुंकणार का हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. एकंदरीतच नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा जाहीर करण्यात आली नसली तरी मात्र कोण कोठे लढणार याबाबत मात्र ठरले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube