‘औरंगाबाद अन् उस्मानाबाद’ नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार

‘औरंगाबाद अन् उस्मानाबाद’ नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार

पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून औरंगाबाद आणि उस्मनाबाद या नावानेच लोकसभा निवडणूक होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याबाबतचे पत्रही दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याची मागणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधून होत होती. या मागणीची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत केला. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने याच प्रस्तावात थोडा फेरफार केला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. केंद्र सरकारनेही या प्रस्तावाला मान्यता दिली. (Election Commission of india clarified that the Lok Sabha elections will be held in the same names as Aurangabad and Osmanabad)

Manoj Jarange : “सरकारची भूमिका स्पष्ट नाही म्हणून मी”.. उपोषणाआधी जरांगेंचा सरकारला इशारा

त्यानंतर गतवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शिंदे सरकारने ही नामांतर प्रक्रिया प्रशासकीय आणि महसुली पातळीवरही पूर्ण केली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगालाही याबाबतची कल्पना देण्यात आली. यानंतर परिसीमन कायदा 2002 च्या कलम 11/2 मधील तरतुदीनुसार 31 जुलै 2006 च्या परिसीमन आदेशामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेण्यात यावी, असे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कळवले होते.

निखील वागळेंसह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल, हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा

मात्र परिसीमन आयोगाच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय निवडणूक आयोगाने या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे लोकसभेची निवडणूक औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावांवरच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube