निखील वागळेंसह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल, हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे आणि इतर पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणात 250 ते 300 कार्यकर्त्यांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिला गुन्हा हल्ला करणाऱ्या भाजपच्या (BJP) शहाराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यासह 43 आंदोलकांवर दाखल झाला आहे. तर ‘निर्भया बनो’ सभेचे आयोजक, निखील वागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि सभेला उपस्थित असणारे अशा जवळपास 200 ते 250 जणांवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two separate cases have been registered against 250 to 300 activists in the attack on senior journalist Nikhil Wagle and other progressive activists)
काल (9 फेब्रुवारी) निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तर ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या अध्यक्षतेमध्ये दांडेकर पुलाजवळील निळु फुले सभागृहात ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत या सभेला जातानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलाजवळ वागळे यांच्या गाडीला लक्ष्य केले.
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली
कार्यकर्त्यांनी दगड फेक करत हॅाकी स्टिक्स, रॉड्सने गाडी फोडली, काचा फोडल्या. या तिघांच्याही अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांनी वागळे, चौधरी आणि सरोदे यांच्या गाडी गाडीला कडे करुन संरक्षण दिले अन् ही मंडळी निर्भय बनोच्या सभास्थळी पोहचले. त्यानंतर प्रचंड गर्दीत सभा पार पडली. या सगळ्यांनीच दाखविलेल्या धाडसाचे सध्या सोशल मिडीया आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड कौतुक होत आहे.
मात्र त्याचवेळी या सगळ्यांवरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ, तर भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते अशा एकूण 43 जणांवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
“राज्याचे पोलीस दल भाजपने विकत घेतले, आजच्या हल्ल्याला तेच जबाबदार” : वागळेंचे गंभीर आरोप
तर ज्या ठिकाणी सभा होणार होती तिथे पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला होता. मात्र या आदेशाचे उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते बेकायदेशीररित्या सभास्थळी जमले होते. त्यामुळे वागळे यांच्यासह सर्व आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वागळे यांच्यावर दोन दिवसांत हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते सुनील देवधर यांच्या तक्रारीनंतर 153 (अ), 500 व 505 या कलामांतर्गंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.