Lok Sabha Election : भुजबळांसाठी हेमंत गोडसेंचा राजकीय बळी महायुतीसाठी आवश्यकच !
Nashik Lok Sabha Constituency: राजकारणातील स्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊनही ती मिळविण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते, असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत नाशिकमधून (Nashik Lok Sabha) महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच असतील, असे जाहीर केले. तरीही त्या गोडसे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी कितीतरी याचना कराव्या लागत आहेत. एवढेच नाही तर गोडसे यांना मुख्यमंत्री शिंदे भेटही देत नाहीत. आपले नक्की काय चुकले, याचाच शोध गोडसे घेत असावेत.
प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उतरविला उमेदवार ! अभय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !
महायुतीच्या जागावाटपात ज्या जागांवरून तिढा निर्माण झाला आहे त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडात ज्यांचा सहभाग होता अशा तेराही खासदारांना सहजपणे उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण त्यातील फक्त सात जणांनाच शिंदे आतापर्यंत उमेदवारी देऊ शकले. गोडसे हे देखील आपल्या उमेदवारीबद्दल निर्धास्त होते. पण समीकरणेच अशी बदलली की त्याच गोडसे यांचा राजकीय बळी देण्याचे निश्चित झाले आहे.
Girish Mahajan : बंडखोरीवरून जुंपली! “बंडखोरांना रोखता येत नाही”; महाजनांचे गुलाबरावांना प्रत्युत्तर
नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकून गोडसे यांच्यासमोर आव्हान उभे केले. महायुतीतील पक्ष एकमेकांच्या मतदारसंघावर दावा सांगणारच, या हेतूने गोडसे यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शांतिगिरी महाराज किंवा इतर कोणी सेलिब्रिटी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून रिंगणात उतरविणार अशीदेखील चर्चा होती. पण श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर गोडसे यांचा जीव भांड्यात पडला. पण तो फक्त काही तासांसाठीच. कारण महायुतीच्या जागावाटपात नाशिकच्या जागेत सातारा लोकसभा मतदारसंघाचेही त्रांगडे आडवे आले. त्यामुळेही गोडसे यांना एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या आक्रमणाचा सामना करावा लागत आहे. गोडसे यांच्या उमेदवारीच्या आड कोणकोणत्या बाबी आल्या आहेत, त्याचा आढावा या निमित्ताने घेऊ.
उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी
सातारा हा मतदारसंघ महायुतीत अजित पवार यांच्याकडेच जाणे अपेक्षित होते. पण तेथून उमेदवारीसाठी भाजपमधून उदयनराजे भोसले यांनी उचल घेतली. ते आपल्या उमेदवारीसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्यामुळे साताऱ्यातून भाजपकडून त्यांची उमेदवारी त्यांनी थेट ठरवून आणली. दिल्लीतून उमेदवारीचा शब्द घेतल्यानंतर मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे साताऱ्याचा मतदारसंघ राष्ट्रवादीऐवजी भाजप लढविणार, हे देखील स्पष्ट आहे. मग त्या बदल्यात राष्ट्रवादीला कोणती जागा द्यायची, असा प्रश्न आला.
नाशिक भाजपकडे नाही तर राष्ट्रवादीकडे
नाशिकची जागा भाजपला हवी होती. वेळ पडली तर भाजपकडूनही लढण्याची तयारी गोडसे यांनी ठेवली असती. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले. कारण राष्ट्रवादी काॅंग्रेसलाही साताऱ्यासारखाच विजय मिळवून देणारा मतदारसंघ हवा होता. तो देखील त्यांची ताकद असलेलाच हवा होता. त्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीने मागितली. त्यामुळे गोडसे यांची अडचण झाली.
भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी सारेच आग्रही
महाराष्ट्रातील राजकारण गेले काही महिने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तापले होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी महायुतीने छगन भुजबळ यांच्यावर सोपवली. भुजबळ यांनी आक्रमकपणे जरांगे यांच्यावर तिखट हल्ला चढवत ओबीसींची ताकद आपल्यामागे उभी केली. मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण त्यामुळे झाले. जरांगे हे शरद पवार यांचे स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप महायुतीने त्यांच्यावर केला. भाजपचे नेते त्यात अग्रभागी होते. त्यामुळे साहजिकच ओबीसींची सहानुभूती भाजपकडे पर्यायाने महायुतीला मिळेल, असा हिशोब यामागे होता. पण ज्यांनी ओबीसींसाठी रान पेटविले त्या भुजबळांना संधी का द्यायला नको, असा विचार या मागे करण्यात आला. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या गटाकडून डाॅ. अमोल कोल्हे हे माळी समाजाचे उमेदवार आहेत. ओबीसीत सर्वाधिक संख्येने असलेल्या महायुतीकडे माळी समाजातील तगडा उमेदवार भुजबळ हेच ठरू शकतात. भुजबळ यांना उमेदवारी दिली तर मराठा मते नाराज होऊ शकतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून सांगण्याचा प्रयत्न झाला. पण भाजपने जाहीर केलेल्या 22 पैकी 12 उमेदवार हे मराठा आहेत. त्यामुळे मराठा समाज नाराज होणार नाही, अशी हमी भाजपकडून घेण्यात आली. याउलट ओबीसी मते राज्यभरात मिळवायची असेल तर भुजबळ यांची उमेदवारी आवश्यक आहे, हे भाजपने शिंदे यांना पटवून देण्याचा निश्चय केला आहे. या प्रस्तावाला साहजिकच अजित पवार यांची संमती आहेच.
खुद्द भुजबळ यांच्यासाठीही लोकसभेवर जाण्याचा पर्याय सोयीचा आहे. ते लोकसभेवर निवडून गेले तर राष्ट्रीय राजकारणात जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यांचा मुलगा पंकज याला पुढे त्यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमविण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. पंकज भुजबळ यांनी या आधी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली होती. पण तेथे आता शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. कांदे यांनीच पंकज यांचा पराभव केला होता. महायुती विधानसभा निवडणूक एकत्र लढलीच तर नांदगावची जागा ही शिवसेनेकडे जाणे निश्चित आहे. त्यामुळे पंकज यांच्यासाठी त्यांचे वडिल लोकसभेवर जाणे फायद्याचे ठरणार आहे.
छगन भुजबळ यांच्या लोकसभा उमेदवारीत अशा अनेकांच्या सोयी असल्याने त्यात गोडसे यांचा राजकीय बळी जाण्याचाच धोका जास्त आहे. तशी तयारी महायुतीने केली आहे. फक्त हेमंत गोडसे यांना ते केव्हा समजणार हा प्रश्न आहे.