अर्बन बँक घोटाळ्यात फडणवीस कारवाईची धमक दाखवणार का? सभासद चोपडांचे खरमरीत पत्र
Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना होऊन 113 वर्षे झालेली आहेत. सदर बँकेचे 4 ऑक्टोबर 2023 रोजी रिजर्व्ह बँकेकडून लायसन रद्द झाले आहे. या दिवसापर्यंत जवळपास 820 कोटी रूपये थकबाकी आहे. संस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळत नाहीत. ठेवीदारांचे 350 कोटी रूपये बँकेत अडकले आहेत. नगर अर्बन बँकेवरील रिजर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे माझ्या आणि इतरही अनेक गोरगरीब लोकांच्या यात ठेवी अडकलेल्या आहेत. एसआयटीमार्फत तपास सुरू असला तरी धिम्या गतीने आहे.
आरोपी समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत. पुण्यातील अपघात प्रकरणात पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपींची धरपकड केली. याच पद्धतीने अर्बन बँक प्रकरणात सरकारने गंभीरता दाखवून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे. याबाबत चोपडा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, बँकेतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी चालू आहे. फॉरेन्सिक ऑडीट करण्यात आले आहे. फॉरेन्सिक ऑडीटच्या रिपोर्टनुसार या संपुर्ण प्रकरणात 105 आरोपी निष्पण्ण झाले आहेत. या आरोपींवर कारवाई करण्यासाठी एसआयटी नेमलेली आहे. आजपर्यंत 10 ते 12 आरोपींना अटक झाली आहे. इतर आरोपींपैकी काही जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहेत. या आर्थिक गुन्ह्यातील सर्व मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी कठोर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव
नगर अर्बन बँकेचे मोठमोठे कर्जदार जे पोलिसांनी आरोपी केले आहेत, त्यांना अद्याप अटक का होत नाही? पोलीस जर कारवाई करणार नसतील तर कारवाई कोण करणार? असे सवाल राजेंद्र चोपडा यांनी विचारले आहेत. या गुन्ह्यात आरोपी राजरोसपणे नगर शहरात येतात, मतदान करतात, पोलिसांच्या समोरून फिरतात तरी देखील पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत, अशी खंत चोपडा यांनी व्यक्त केली आहे.
आठ दिवसांच्या आत या आरोपींवर कारवाई न झाल्यास मला हायकोर्टात जावे लागेल असा इशारा राजेंद्र चोपडा यांनी या पत्राद्वारे दिला आहे. या प्रकरणात 10 ते 15 मोठे अजून आरोपी आहेत. ज्यांनी सर्व फंडामध्ये आणि व्यवहारामध्ये घोटाळे घातलेले आहेत. ते आम्ही पोलीसांच्या नजरेस आणून दिले आहेत. तरी देखील कठोर कारवाई होत नाही त्यामुळे आपण नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राजेंद्र चोपडा यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नगर अर्बन बँक गैरकारभाराची एसआयटी चौकशी…कोणी केली मागणी?
या बँकेचे 80-80 वर्षांचे ठेवीदार हे पैसे मिळण्यासाठी वेळोवेळी चकरा मारत आहेत, त्यांचे हाल पाहून मनाला अत्यंत वेदना होत आहेत. तरी याबाबत तात्काळ योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती. आपण तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून कारवाई न केल्यास हायकोर्टात दाद मागावी लागेल असा इशारा राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे.