फडणवीसांशी चर्चा केल्यानंतरच नाराजीचा खुलासा करणार; राम शिंदेंच्या मनात विखेंबाबत अजूनही खदखद!
Ram Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) तिकीट दिले. त्यानंतर काही प्रसंगी भाजप आमदार राम शिंदे आणि (Ram Shinde) विखे एकत्र दिसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराजी मिटली असून दोघेही एकदिलाने काम करतील असे वाटत होते. परंतु, राम शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांनी नाराजी अजून कायम असल्याचेच संकेत दिले आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी मागील पाच वर्षांच्या काळात घडलेल्या विविध घटनांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी (Devendra Fadnavis) चर्चा केल्यानतंरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर होती हे मी स्पष्ट करेल, असे वक्तव्य आमदार राम शिंदे यांनी केले.
नगर शहरातील वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राम शिंदे यांनी हजेरी लावली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राम शिंदे पुढे म्हणाले, या मतदारसंघातून मी सुद्धा इच्छुक होतो. परंतु, मला उमेदवारी नाकारताना कोणते निकष लावले हे मला सांगता येणार नाही. मात्र तरीही मी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची ग्वाही सुद्धा दिली.
Sujay Vikhe : ‘कोल्हेंच्या आमंत्रणाला मी किंमत देत नाही’; खासदार विखेंचा खोचक टोला
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्या बरोबर चर्चा केली. या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. यानंतर विखेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजले. या भेटीनंतर फडणवीसांनी अद्याप मला निरोप पाठवलेला नाही. याबाबत मात्र त्यांच्याशी चर्चा करणार आहे. यानंतर नाराजीचे काय मुद्दे होते हे मी स्पष्ट करेल. मागील पाच वर्षांच्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्यांचे निरसन होण्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील कर्जत जामखेडला गेल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या या दौऱ्याबाबत मला माहिती देणे आवश्यक होते अशा शब्दांत राम शिंदे यांनी पुन्हा नाराजी बोलून दाखवली. यानंतर त्यांनी पारनेर विधनसभेचे आमदार निलेश लंके यांच्या भेटीवरही भाष्य केले. नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला मी उपस्थित होतो. आपल्या हिंदू संस्कृतीत एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर चांगले वक्तव्य केले पाहिजे. या भूमिकेतून मी त्यांनी मनोकामना पूर्ण होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
नगर दक्षिण लोकसभेवरुन रस्सीखेच! राम शिंदे हे विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक का?