पाथर्डीतील शिरसाठवाडीत राडा, जमाव आक्रमक; आमदारासह कार्यकर्त्यांवर दगडफेक
Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आज सायंकाळी सहा वाजता मतदान झालं. मतदाना दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राडा झाला. आता अशीच एक बातमी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून समोर आली आहे. मतदानानंतर पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी गावात चांगलाच गदारोळ झाला. येथे वादातून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार मोनिका राजळेही तेथे उपस्थित होत्या.
बुधवारी सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर दगडफेकीचा प्रकार घडला. यावेळी मोनिका राजळेही येथे उपस्थित होत्या. आक्रमक जमावापासून बचाव व्हावा यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रात आश्रय घेतला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन तास मतदान केंद्रात बसून असलेल्या आमदार राजळे यांची सुटका केली. या घटनेनंतर आमदार राजळे यांचे समर्थकही चांगलेच संतप्त झाले होते.
Assembly Elections : शेवगाव-पाथर्डीत भाजप विजयी हॅट्रिक करणार की राष्ट्रवादीची वेळ येणार?
राजळेंच्या समर्थकांनी नंतर शहरातील माणिकदौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या घटनेत आमदार राजळे आणि त्यांचे काही समर्थक कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास मात्र आमदार मोनिका राजळे यांनी नकार दिला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर वाद सुरू असल्याची माहिती आमदार राजळे यांना मिळाली. त्यानंतर त्या स्वतः या ठिकाणी पोहोचल्या. त्यावेळी येथील जमावाने राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. याबाबत न्यूज 18 मराठीने वृत्त दिले आहे.
मुंडे-ढाकणे सत्तासंघर्ष; मोनिका राजळेंसाठी मुंडे भगिनींची ताकद