“वेळ पडली तर नाथाभाऊंकडे हक्कानं मत मागणार”; रक्षा खडसेंच्या वक्तव्याची चर्चा
Lok Sabha Election : रावेर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच (Raksha Khadse) पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे मविआचे उमेदवार असतील अशी चर्चा होती मात्र या दोघांनीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे.
ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी (Lok Sabha Election) कुणीही असो पक्षाचं एक धोरण असतं. निवडणूक आल्यानंतर आपण विरोधी पक्षनेत्यांच्या घरी जातो त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतो. कार्यकर्त्यांनाही हात जोडून विनंती करतो. मत मागतो. ज्यावेळी प्रचार केला जातो त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरी जाऊन आपण त्यांनाही विनंती करतो की आमच्या पक्षाला मतदान करा.
नाथाभाऊंनी बऱ्याच वर्षांपासून भाजपात काम केलं आहे. ते इथलेच नेते होते. आता चार वर्षांआधी ते राष्ट्रवादीत गेले आहेत. येथील सर्व कार्यकर्ते नाथाभाऊंना जवळून ओळखतात, असे रक्षा खडसे म्हणाल्या. यानंतर पत्रकारांनी त्यांना नाथाभाऊंकडे मत मागणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर खडसे म्हणाल्या, नक्कीच मागणार. मी आधीच सांगितलं आहे की त्यांच्याकडे (एकनाथ खडसे) हक्काने मत मागणार. प्रत्येकाकडे मत मागणार. शेवटी मत द्यायचं की नाही द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण विनंती मी सगळ्यांनाच करणार आहे.
Eknath Khadase यांच्या डोक्यावर परिणाम, चप्पल घ्यायलाही पैसे नाही; महाजनांची बोचरी टीका
दरम्यान, रोहिणी खडसे या लोकसभेसाठी इच्छुक नाही तर त्यांनी मुक्ताईनगर विधानसभेसाठी तयारी केली आहे. जर खडसे कुटुंबातील उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात नसेल तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी होईल का? यावर बोलताना खडसे म्हणाले होते की, राष्ट्रवादीचा जो उमेदवार या मतदारसंघातून उभा असेल. त्यांच्यात चुरशीचा सामना होईल. तसेच त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होईल. अशी असा विश्वास यावेळी खडसे यांनी व्यक्त केला होता.