एक-दोन नव्हे तर तब्बल 6 कोटींचा मुद्देमाल जप्त, 260 जेरबंद; संतोष खाडेंची धडाकेबाज कारवाई

अहिल्यानगर – नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये (Ahilyanagar Police Squad) एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade). आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. अवैध धंदे तसेच तंबाखू व गुटखाजन्य पदार्थांवर खाडे यांनी आक्रमक भूमिका घेत कोट्यवधींचा माल जप्त केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. या गेल्या महिनाभरात तब्बल 54 ठिकाणी छापे घालून 260 आरोपी जेरबंद केले आहेत. तसेच या कारवाईत पाच कोटी 97 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एक बटण दाबलं तर… हनीट्रॅप अन् गिरीश महाजनांबाबत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक खाडे यांनी अवैध धंद्यांविरोधात चांगलीच कंबर कसली आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि निर्भीड कारभारामुळे जिल्ह्यात अवैध धंदे चालकांची दादागिरी संपुष्टात येत असून, अवैध धंदे करणारे सुतासारखे सरळ होत आहेत. अगदी पान टपरीवरही मावा-गोवा विक्री बंद झाली असून खाडे यांच्या नावाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. त्यांनी अवघ्या महिन्याभरात नगर जिल्ह्यात केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांच्या सारख्या खमक्या पोलीस अधिकाऱ्याची नगर जिल्ह्याला गरज असल्याच्या प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करत आहे.
तब्बल सहा कोटींचा मुद्देमाल
संतोष खाडे यांच्या पथकाने 17 जून ते 19 जुलै या कालावधीत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे घातले. त्यात सर्वाधिक कारवाई सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीवर करण्यात आली. त्यात सुमारे दोन कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 52 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 15 जुगार अड्ड्यांवर छापे घालून 156 आरोपी जेरबंद केले, तर एक कोटी 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध वाळू वाहतूक व विक्री करणाऱ्या 6 ठिकाणी छापे घालून सुमारे दोन कोटी 54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील पोलीस पथकांची दिखाऊ कारवाई…
नगर जिल्ह्यात अवैध धंदे तसेच गुन्हेगारी याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वारंवार पोलिसांना याबाबात नागरिकांकडून देखील निवेदन देण्यात येतात. मात्र कारवाया बाजूलाच राहतात, केवळ आश्वसन देण्यात येतात. जुगार, पट्ट्यांचे क्लब, अवैध दारू हे खुलेआम पणे जिल्ह्यात सुरु आहेत. मात्र पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाई करत दिखाऊ कारवाईचे प्रदर्शन केले जाते. आर्थिक तडजोडीतूनच हे सर्व अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलले जात नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे.
खासदारांचे आंदोलन…आश्वासन…अन् चिडीचूप
काही दिवसांपूर्वी नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर नागरचे खासदार निलेश लंके यांनी आंदोलन केले होते. पोलीस प्रशासनावर आरोप करत अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांवर आरोप त्यांनी केले. त्यानंतर मिळालेल्या आश्वसनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र जिल्ह्यात अवैध धंदे असो किंवा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरूच आहे. आंदोलनांमुळे लोकप्रतिनिधी देखील चर्चेत येतात मात्र आपण हाती घेतलेला प्रश्न मार्गी लागला कि नाही याबाबत तेही गंभीर नसल्याचे यामाध्यमातून समोर येते.