“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे बहुमत पण, आता त्यांना..” भुजबळांचा इशारा नेमका कुणाला?

“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे बहुमत पण, आता त्यांना..” भुजबळांचा इशारा नेमका कुणाला?

Chhagan Bhujbal : राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाहीत, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. छगन भुजळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असू शकेल यावर भाष्य केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांना CM म्हणून पाठिंबा आहे का?, भुजबळ म्हणाले, आमचा विरोध..

भुजबळ पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा फडणवीस यांनी मी बाहेरून काम करेन असं सांगितलं होतं. पण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांना सरकारमध्ये राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी त्या सूचनांचं पालन केलं.

पक्षाचा आदेश मानला. महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून त्यांनी सहकार्य केलं. शक्ती पाठीमागे उभी केली. त्यामुळे आता काही लोक त्यांना टार्गेट करत आहेत. याचं कारणही तेच आहे असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आता त्यांनी कुणाचं नाव न घेता वक्तव्य केल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

छगन भुजबळ असं काहीच बोलले नाहीत; पुस्तकातील दावे चर्चेत येताच अजितदादा उतरले मैदानात

..तर माझं मताधिक्य लाखांच्या पुढे गेलं असतं

ईव्हीएम मशीनवर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. ईव्हीएममधील मतदानात तफावत असल्याचा आरोप या पक्षांकडून केला जात आहे. काँग्रेसने तर ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी सुद्धा केली आहे. अशातच या मुद्द्यावर छगन भुजबळांनी विरोधकांना चांगलंच घेरलं आहे. 2019 मध्ये माझं मताधिक्य 56 ते 57 हजारांवर गेलं होतं ते कमी होऊन 26 किंवा 27 हजारांवर आलं. मनोज जरांगे वगैरे काही मंडळी मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत फिरत होती. जर खरंच ईव्हीएमचा घोळ असता तर माझं मताधिक्य एक लाखांच्या पुढे गेलं असतं असं भुजबळ म्हणाले.

आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राची धास्ती

राज्याचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यासाठी आज राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. सध्या तरी फडणवीसांचाच दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र तरी देखील ऐनवेळी दुसरेच नाव समोर येईल का अशी शंकाही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याबाबत विचारले असता फडणवीस यांनी काहीच न बोलता फक्त हात जोडले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube