नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बदलांना विरोध; मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकी

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बदलांना विरोध; मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकी

Ahilyanagar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज (4 मार्च) मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट दाखवली.

या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी येत्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. त्याचसोबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची रणनीती ठरवण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये प्रस्तावित बदल करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. रेल्वे मार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आ. माणिकराव कोकाटे, आ. सत्यजीत तांबे, आ. दिलीप वळसे पाटील आणि आ. अमोल खताळ हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. अमोल कोल्हे, आ. बाबाजी काळे आणि आ. शरद सोनावणे हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.

नगर-मनमाड हा रस्ता संशोधनाचा विषय, आमदार सत्यजित तांबेंचा खोचक टोला

पुणे-नाशिक ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द केला असून, त्याऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वीच्या रेल्वेमार्गामुळे जीएमआरटी केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच व्हावा अशी मागणी लोकप्रतिनिधींची आहे.

या बदलाला विरोध होण्याची कारणे:

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास ७०-८० किमी आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास दीड तासांचा आहे. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास “सेमी हायस्पीड” हा मूळ उद्देश फोल ठरेल.

पुणे – नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच होणे गरजेचे आहे.

GMRT मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे.

या बैठकीत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत संघर्ष करण्याचा निर्धार केला. सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा दिला, तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकेल.

पुणे-नाशिक रेल्वेच्या आराखड्यात बदल, संगमनेरची परवड; आ. तांबेंची मोठी मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube