राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी एकवटले; आमदार तनपुरे करणार कृती समितीचं नेतृत्व

राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी एकवटले असून आमदार प्राजक्त तनपुरे कृती समितीचं नेतृत्व करणार आहेत.

Prajakt Tanpure

Rahuri-Shanishingnapur Railway : राहुरी-शनिशिंगणापूर (Rahuri-Shanishingnapur Railway) प्रस्तावित रेल्वेमार्गाच्याविरोधात शेतकरी एकवटले असून कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या कृती समितीचं नेतृत्व आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) करणार आहे. रेल्वेमार्गाविरोधात पुढील काळात गरज पडल्यास मुंबईसह दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या बैठकीत दिला आहे.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार तनपुरे म्हणाले की, प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून, काहींच्या शेतीचे दोन तुकडे होणार आहेत. या परिसरात कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत किंवा रोजगारनिर्मितीचा प्रकल्प नसताना केवळ रेल्वेमार्गासाठी सुपीक शेतीचे नुकसान करणे योग्य ठरणार नाही. विकासासाठी आवश्यक आणि लोकहिताचा प्रकल्प असता, तर त्याला विरोध केला नसता. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

कॉक्रोच जनता पार्टीला 1 कोटींची मदत जाहीर; आंदोलकांसाठी वेबसाईट अन् कायदेशीर मदत पुरवणार

या विषयावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आवश्यकतेनुसार मुंबई तसेच दिल्ली येथेही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रत्येक गावातून पक्षीय भेद बाजूला ठेवून सक्षम प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याचे आवाहन करताना तनपुरे यांनी या समितीत शेतकरी, वकील, पत्रकार, सोशल मीडियाचे जाणकार तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना केली. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी गावागावांत जनजागृती मोहीम राबविणे, माध्यमांच्या माध्यमातून विषय मांडणे आणि सोशल मीडियावर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जमिनी संपादनासाठी कोणताही करार करू नका. प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कांचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. गरज पडल्यास जेलभरो आंदोलन करण्यासही आम्ही तयार आहोत, असे ठाम प्रतिपादन आ. तनपुरे यांनी केले. बैठकीत उपस्थित शेतकरी आणि विविध गावांतील प्रतिनिधींनीही प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या शेवटी प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात कृती समिती स्थापन करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून प्रतिनिधींची नावे तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील आंदोलनाची दिशा कृती समितीच्या माध्यमातून निश्चित केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी बैठकीला बैठकीस तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, सुनील अडसूरे,विजय बानकर, राजेंद्र ढोकणे, भागवत देशमुख, डॉ.राजेंद्र बानकर,संचालक डॉ.माऊली दरंदले, धनंजय, वसंत कुसळकर, व्ही. एम. दरंदले, एस.बी.शेटे, शेतकरी संघटनेचे नेते अनिल निमसे, रामेश्वर कुसळकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मी पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला तेव्हा…’; ‘ब्रँड न्यू डे’च्या प्रदर्शनापूर्वी ऋषभ शेट्टीने व्यक्त केले सुपरहिरोवरील प्रेम

दरम्यान, रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी आपल्या परिसरात कोणत्याही शेतकऱ्यांनी रेल्वे लाईन उभारण्यासाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी ठेकेदारास आपल्या जागा शेती कोणत्याही आर्थिक स्वरूपात देऊ नये. तसेच शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीशी उभे रहा. ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल, त्यावेळी सर्वात आधी पुढे प्राजक्त तनपुरे राहिलं. एखादा मोठा उद्योग आला असता तर आम्ही विरोध केला नसता पण शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उध्वस्त होऊ देणार नाही, असं तनपुरे यांनी स्पष्ट केलंय.

follow us