Sandeep Kotkar : ‘आता मी मागे हटणार नाही…’; संदीप कोतकरांचा रोख कोणावर?
Sandeep Kotkar News : राज्यात पुढील काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वीच आता नगर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय. माजी महापौर संदीप कोतकर यांचे विधानसभेपूर्वी नगर शहरात आगमन व विधानसभा लढणार अशी चर्चा रंगू लागली होती. संदीप कोतकरांच्या जिल्हा प्रवेशाला उच्च न्यायालयात शंकर राऊत यांनी आव्हान दिलंय. यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही….नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही…अशा शब्दात कोतकर यांनी एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय म्हटलयं?
माझ्या प्रिय नगरकरांनो, नमस्कार…
गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या व्ययक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही. परंतू आता वेळ आलीय बोलायची… म्हणून आपल्याशी हितगूज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे.
तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करतांना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय. ही मनोमन इच्छा आहेच.
आम्ही यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही; ठाणे पोलिसांनी पाच मिनीटात पत्रकार परिषद आटोपली
महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापीही शक्य नाही. नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही. आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तूम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात.
मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी बदलापूर घटनेत एन्काउंटर; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर थेट घाव
हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले. अन ह्दय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तूम्हाला शब्द आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय… पण आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही….नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही…शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….लवकरच भेटूत…अस पोस्टमध्ये म्हंटल आहे.
दरम्यान, संदीप कोतकर यांनी मी मागे हटणार नसल्याची पोस्ट केल्याने नगर तालुका विधानसभा मतदारसंघासाठी संदीप कोतकर मैदानात उतरणार का? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.