मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर
Sharad Pawar NCP Announced Candidate Name List For Loksabha : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवारांना (दि.29) रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलेल्या निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात आली आहे. लंके आणि सुळे यांच्या नावांबरोबरच पवार गटाकडून वर्धा, दिंडोरी, शिरूर आदी ठिकाणच्या उमेदवारांचीदेखील नावे घोषित करण्यात आली आहेत. भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत.
कुणाला मिळाली उमेदवारी
१) वर्धा – अमर काळे
२) दिंडोरी – भास्कर भगरे
३) बारामती – सुप्रिया सुळे
४) शिरूर – डॉ.अमोल कोल्हे
५) अहमदनगर – निलेश लंके
विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे!… pic.twitter.com/oiXVgTvXP1
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 30, 2024
दिंडोरीत भारती पवारांविरोधात भगरे
केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिंडोरी लोकसभेसाठी पुनश्च भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बारामतीत पुन्हा सुप्रिया सुळे
शरद पवार यांच्या गटाकडून बारामतीत सुप्रिया सुळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. आज अखेर सुप्रिया यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीनंतर आता बारामतीमध्ये महायुतीकडून सुळेंच्या विरोधात बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा
आढळरावांविरोधात कोल्हे मैदानात
अमोल कोल्हे यांना शिरुरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्याशी लढत होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार
नगर दक्षिणमधून निलेश लंकेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके म्हणाले की, पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून जी संधी मला दिली त्याला कधी तडा जाऊ दिला जाणार नाही.अस्तित्वासाठी निवडणूक लढवणारा एक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. पण मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक लढवत आहे. कोण काय टीका टिपणी करते याकडे लक्ष न देता निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आपण जनतेसाठी काय करणार आहोत हे दाखवून देणार असल्याचेही लंकेंनी यावेळी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढवणार असल्याचेही यावेळी लंकेंनी स्पष्ट केले.