ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी आली समोर! भाऊसाहेब वाकचौरेंच्या बैठकीत तुफान राडा
Shirdi Loksabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group)नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांच्या एका सभेत चांगलाच राडा झाला आहे. ठाकरे गटातील अंतर्गत खदखद ही यानिमित्ताने बाहेर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. झालं असं की, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर (Sangamner)तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा समन्वयक आणि संपर्क प्रमुखांसमोर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले. माजी खासदार वाकचौरे यांच्या समोरच दोन गटात तुफान शिवीगाळ आणि हाणामारी झाल्याचे दिसून आले.
‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार लोखंडेंवर अन्सारचाचांची खास डायलॉगबाजी
लोकसभेचे बिगुल वाजले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध शिवसेना शिंदे गट अशीच लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र करत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शहराजवळ असलेल्या रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये एकत्र जमण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे दुपारी एकत्र आले.
Loksabha Election : भाजपने CM एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडूंचे टीकास्त्र
संगमनेर तालुक्यातील विविध गावातून शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आले होते. लोकसभा समन्वयक व संपर्कप्रमुखांसमोर वाकचौरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी आर्थिक जुने वाद उकरुन काढले. त्याचवेळी कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ, अंगावर धावून जात वादाला सुरुवात झाली. यावेळी वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत खडे बोल सुनावले. यातून पक्षांतर्गत असलेली गटबाजी आणि नाराजी या बैठकीतून बाहेर आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदावारी जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याला सुरुवात केली आहे.
शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये परीक्षा होणार आहे. आणि शिर्डी लोकसभेचा पेपर कोणाला सोपा तर कोणाला अवघड जाणार हे देखील पाहावं लागणार आहे. बाकी काही असलं तरी आज संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील या राड्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत कलह हा तर सर्वांसमोर आला आहे.