साखर विक्रीच्या नावाखाली 58 लाखांना फसवलं; शिवसेना उपनेते साजन पाचुपतेंसह संचालक मंडळावर गुन्हा!
छत्रपती संभाजीनगर : साखर विक्रीचा करार करूनही व्यापाऱ्याला साखरेचा पुरवठा न केल्याप्रकरणी श्रीगोंद्यातील साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन साजन सदाशिव पाचपुते (Sajan Pachpute) यांच्याविरोधात कन्नड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलायं. शिवसेनेचे उपनेते, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांच्यासह कारखान्याच्या संचालक मंडळाने व्यापाऱ्याचे तब्बल 58 लाख रुपये परत दिलेले नाहीत, याउलट व्यापाऱ्याला धमकावल्याची तक्रार व्यापाऱ्याने पोलिसांत दिलीयं. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने साजन पाचपुते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कन्नड येथील दीपक फकिरचंद पांडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिलीयं. पांडे यांचे कन्नड येथे प्रिमियम अॅग्रो इनपुटस अॅण्ड टॅन्ट सर्व्हिस नावाचे भुसार मालाचे दुकान आहे. दीपक पांडे यांच्या आत्याचा मुलगा सुमीत महावीर काला यांची श्रीरामपूर येथे मनोज शुगर नावाची फर्म आहे. सुमीत काला यांच्या माध्यमातून पांडे यांची साजन पाचपुते यांच्याशी ओळख झाली. त्यातून पांडे यांनी साजन पाचपुते यांच्या कारखान्यातून साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बॉण्डवर करारही करण्यात आला.
Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’मधील ‘या’ भूमिकेसाठी रियाने दिले ऑडिशन, अभिनेत्याचा मोठा खुलासा
आगाऊ रक्कम दिल्यास क्विंटलमागे पाचशे रुपयांची सूट दिली जाईल, असे साजन पाचपुते यांनी सांगितले. तसेच करारनामा करण्यात आला होता. त्यानुसार पांडे यांनी कारखान्याच्या एचडीएफसीच्या खात्यावर 62 लाख रुपये पाठविले. करारानुसार 2 हजार क्विंटल साखर 3 हजार 100 रुपये दराने 1 डिसेंबर 2022 पर्यंत देण्याचे ठरले होते. ते दोन हजार क्विंटल साखर देऊ शकले नाही तर क्विंटलमागे एक हजार रुपये नफा किंवा 18 टक्के वार्षिक व्याज देण्याचं करारात म्हटले होते.
करारवेळी साजन पाचपुते यांनी सेक्युरिटी म्हणून कारखान्याचे एचडीएफसी बँकेचे पुणे शाखेचे आणि त्यांचे वैयक्तिक काष्टी येथील युनियन बँकेचे तारीख नसलेले चेक दिले. विचारपूस करूनही साखर देण्यास पाचपुते यांनी टाळाटाळ केली. तसेच तुमच्याकडून काय होईल ते करून करून घ्या, अशी धमकीही दिल्याचे पांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पाचपुते यांनी दिलेले 62 लाख रुपयांचे चेक बाउन्स झाले. चेक न वटल्याने त्यांनी आम्हाला व्याजभरण्यासाठी चार लाख रुपये बँक खात्यावर पाठविले. परंतु त्यांच्याकडे 58 लाख रुपये आणि वार्षिक 18 टक्के व्याजाचे दोन वर्षांचे असे 78 लाख 88 हजार रुपये येणे बाकी आहेत. अनेकदा मागणी करून ही पैसे परत केले जात नसल्याचं तक्रारीत म्हटलंय.
साखर दुसरीकडे विकून फसवणूक
साजन पाचपुते आणि संचालक मंडळ यांनी करारनामानुसार साखर आम्हाला न देता ती साखर स्थानिक बाजारपेठेत तसेच इतरत्र निर्यात करून आमची फसवणूक केली आहे. पांडे यांनी आयसीआयसीआय बँकेकडून लोन घेतले होते. त्यामुळे पांडे हे डबघाईला आले असून, त्यांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पांडे यांनी व्यवहाराचे सर्व कागदपत्रेही पोलिसांकडे दिले आहेत.