नाशिक वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; पक्षीय गणित काय अन् कोण इच्छूक?
लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळत नसल्याची खंतही इथ बोलून दाखवली जाते.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाच्या (Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक जाहीर होताच आता तिन्ही जिल्ह्यांतील राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. यावेळी गडचिरोली जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं असा सूर उमटत आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळत नसल्याची खंतही इथ बोलून दाखवली जाते. आता किमान विधान परिषदेत तरी गडचिरोलीला संधी द्या असा सूर अनेक कार्यकर्त्यांचा आहे.
राजकीय घराण्यात उमेदवारीची चर्चा
काँग्रेस आणि भाजपर अशा दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अनेकांना मागं डावलं आहे तर काहींना शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता चाचपणी करताना मोठी कसरत इथ सुरू झाली आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याचं बोलले जात आहे. पक्षाच्या ‘संघटन सृजन’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या इच्छूक असल्याने कार्यकर्त्यांच्या वाट्याला पुन्हा वेटींग येती की काय असंही दबक्या आवाजात बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत.
भाजपमध्येही इच्छुकांची मोठी गर्दी
भाजपमध्येही माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे आणि प्रशांत वाघरे यांची नावं इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ होत असल्याची टीकाही वारंवार होत आहे. त्यामुळे अनेकदा कंत्राटदार, व्यापारी किंवा प्रभावशाली नेत्यांच्या वारसांना उमेदवारी दिली जाते, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, मागील निवडणुकीत भाजपने संघटनात्मक पातळीवर काम करणारे रामदास आंबटकर यांना उमेदवारी देत वेगळा संदेश दिला होता. त्यामुळे यंदाही तीच परंपरा पुढं जालेलं की पुन्हा राजकीय घरात उमेदवारी जाईल अशी भीती बोलून दाखवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांतील ९७७ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे अंकगणितासोबतच पक्षनिष्ठा, आर्थिक ताकद आणि स्थानिक समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग वाढविल्याने पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकची परिस्थिती काय?
नाशिकमध्ये महायुतीत शिवसेनेने या जागेवर दावा केल्यावर इच्छुकांनीही कंबर कसली असल्याचं दिसतय. शिवसेनेत संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नावं चर्चेत आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ‘उबाठा’कडून उमेदवाराचा शोध सुरू आहेत, तर महायुतीत दराडे यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
२०१८ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे नरेंद्र दराडे विजयी झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहाने यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. २०२४ मध्ये मुदत संपली होती. परंतु महापालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने निवडणूक घेतली गेली नाही. महापालिका, पालिकांच्या निवडणुका झाल्याने आता ही निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जागेवर दावा केला आहे. भुजबळ व दराडे यांच्यात राजकीय वैर आहे. राष्ट्रवादीने स्वतंत्र भूमिका घेतल्यास निकाल बदलू शकतो. महायुतीचा एकच उमेदवार असल्यास विजय सोप्पा राहणार आहे.