छगन भुजबळांच्या नेतृ्त्वात OBC नेते एकवटले; 17 नोव्हेंबरपासून शिंदे सरकारविरोधात एल्गार

छगन भुजबळांच्या नेतृ्त्वात OBC नेते एकवटले; 17 नोव्हेंबरपासून शिंदे सरकारविरोधात एल्गार

मुंबई : ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांनी निर्धार केला आहे. मरणाची लढाई लढावी लागली तरी चालेल. पण कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) आरक्षणाचं रक्षण करणारच, असा निर्धार भाजपचे (BJP) माजी आमदार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी व्यक्त केला. मुंबईत ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर प्रकाश शेंडगे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी “जो ओबीसी के हित की बात करेगा, वही इस राज्य मे राज करेगा” असा इशाराही शिंदे सरकारला दिला. (OBC community leaders met Minister and OBC leader Chhagan Bhujbal)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे, अशी भूमिका घेत भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. मागच्या दारातून ओबीसीमध्ये येण्याचा हा कार्यक्रम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण वेगळं आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. त्यांच्या याच भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वात एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. सभा, आंदोलन, मोर्चा यासाठी तयारी सुरु केली आहे.

Chagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेतून जातील; भुजबळांच्या विधानाने खळबळ

यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांनी निर्धार केला आहे. मरणाची लढाई लढावी लागली तरी चालेल. पण कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं रक्षण करणारच. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी आमची भूमिका आहे. कारण कुणबी दाखले दिले जात असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न आहे. जर कोणत्या दबावाला सरकार बळी पडत असेल तर त्या सरकारचाही आम्ही निषेध करु. शिवाय कुणबी दाखले देणे न थांबविल्यास आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

17 नोव्हेंबरपासून ओबीसींचा एल्गार

यावेळी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा शेंडगे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे. 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होती. त्यानंतर राज्यभर आंदोलन होणार आहे. ओबीसींमध्ये सरकारला खाली खेचण्याची ताकद आहे. ओबीसींची ताकद मतपेटींमधून दिसेल. आम्ही न्यायालयीन लढाईसाठीही तयार आहोत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ते ओबीसीतून नको. मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण द्यावं, अशी भूमिकाही शेंडगे यांनी जाहीर केली.

Sanjay Raut : ‘मुश्रीफ, अजितदादा अन् भुजबळ ‘महादेव अ‍ॅप’ मेंबर’; राऊतांचा गंभीर आरोप

शिवाय जर कोणत्या दबावाला सरकार बळी पडत असेल तर त्या सरकारचाही आम्ही निषेध करु, असेही शेंडगे यांनी सांगितले. “आखिर जो ओबीसी के हित की बात करेगा, वही इस राज्य मे राज करेगा,” असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे सरकारला दिला. दरम्यान, महाराष्ट्रातील ओबीसी समाज धोक्यात आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, असे म्हणत त्यांनी मी देशातील ओबीसी नेत्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube