भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर नाराज; सरकारला घरचा आहेर
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
Omraje Nimbalkar on Tree Cutting : भीमाशंकर येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत तालुक्यात टॅरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी साधारण 100 ते 150 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे अशा झाडांची कत्तल करणं दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
टोरेंटसारखा प्रकल्प नको ; पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? सयाजी शिंदे भडकले
महाराष्ट्राला अल नीनोच्या संकटाचा सामना करावा लागत असताना वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल आणखी बिघडत असल्याचंही ओमराजे यांनी नमूद केलं आहे. विकास प्रकल्प उभारताना पर्यावरणाचं नुकसान टाळण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी वृक्षतोडीबाबत पर्यायी भूमिका मांडली.
एखादं झाड तोडण्यापूर्वी त्या बदल्यात 100 झाडं लावावीत आणि त्यानंतरच प्रकल्पाचं काम पुढे न्यावं, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. भीमाशंकरमधील या प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही विरोध होत आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.