मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर; नक्की काय घडलं?

Encounter In Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरमध्ये एक बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीचा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. (Encounter) अमोल खोतकर असं त्याचं नाव आहे. वाळूज परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले होते तेव्हा ही घटना घडली.
पोलिसांचं पथक याठिकाणी पोहोचलं तेव्हा अमोल खोतकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरु केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या एन्काऊंटरबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. हा एन्काऊंटर कसा झाला, याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे.
वैष्णवीला दिलेली फॉर्च्युनर ते चांदीचे भांडे हगवणेंकडून काय-काय जप्त; पोलिस अधिकाऱ्याने यादीच वाचली
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. त्यावेळी संतोष लड्डा हे कुटुंबीयांसह परदेशात गेले होते. संतोष लड्डा यांचा केअरटेकर बंगल्यात होता. दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोने आणि चांदी लुटून नेली होती. या दरोड्यात लड्डा यांच्या घरातील आठ किलो सोने आणि 40 किलो चांदी, तसेच रोख रक्कम लुटली होती.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर पाच आरोपींना अटक केली होती. अमोल खोतकर हा सहावा आरोपी होता. त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याला अटक करायला गेले होते. मात्र, अमोल खोतकर पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. अलीकडेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर आता अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.