Prakash Ambedkar : नरेंद्र मोदी ईडी, सीबीआयचा गैरवापर करत नाही, मीही तेच केले असते
पुणे : कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेता किंवा पक्ष आपली सत्ता कायम राहावी. यासाठी ज्या काही संस्था, सत्तेचा वापर करता येईल, तेवढे करतच असतात. सध्या भारतीय जनता पार्टीकडून (BJP) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून ईडी (ED), सीबीआयचा (CBI) विरोधकांवर जो वापर करत आहे. तो चुकीचा अजिबात नाही. त्यांच्या जागेवर मी असतो तर हेच केले असते. ज्यांच्यावर कारवाई होत आहे ते चुकीचे वागले म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. कारण हा सत्तेचा खेळ आहे. त्यात राहायचे असेल तर तसे करणे मला काहीही गैर वाटत नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.
एका खासगी वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझ्या राजकारणाचा मुख्य उद्देश हा वंचित घटकांना सत्तेच्या दारापर्यंत घेऊन जाणे हाच आहे. तोच राहणार. नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मोहन भागवत जे काही करतात. ते चुकीचं आहे, असे मला वाटत नाही. त्यांच्या सर्व कृती बरोबरच आहे, असे मला वाटते.
तसेच मी समाजात, राजकारणात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोलणार नाही असे देखील होणार नाही. मी कोणाचाही गुलाम नाही. माझी मते स्वतंत्र आहेत. ती मी मांडत राहणार आहे. मी आता ज्यांच्याबरोबर युती केली आहे. त्या पक्षाची काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर आघाडी आहे. परंतु, त्या दोन्ही पक्षांचा पूर्वइतिहास, अनुभव मला जो आलाय तो मी बोलणारच आहे. त्यामुळे कोणाला काय वाटते, याची मला फिकीर नाही. तरीही सध्या आमची आणि शिवसेनेची युती झाली आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
माझे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याबरोबर काही वैयक्तिक भांडण नाही. पूर्वीच्या अनुभवावरून जे अनुभव मला आले आहेत. ते मी मांडत आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीकडून काही तीव्र प्रतिक्रिया आल्या तर मला काहीही फरक पडत नाही. तसेच त्यांच्या जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणत्याही नेत्याने काही म्हटले तरी माझी जी मते आहेत, ती मी मांडत राहणार आहे.