Prakash Ambedkar : … तर सत्ता बदलानंतर मीडियाच्या मालकांवर कुऱ्हाड पडणार

Prakash Ambedkar : … तर सत्ता बदलानंतर मीडियाच्या मालकांवर कुऱ्हाड पडणार

पुणे : शिवसेना आणि आमची युती फार विचारपूर्वक झाली आहे. मात्र, माझ्या माध्यमावरील मुलाखतीमधून ट्विस्ट करण्याच्या नादात वृत्तवाहिन्या (TV Chanel) चुकीची वाक्य काटछाट करून दाखवत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आमचे कार्यकर्ते फार घट्ट आहेत. मात्र, तरीही हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या काळात सत्ता बदल झाली आणि आमचे सरकार आले तर या टिव्ही चॅनलच्या मालकांवर कुऱ्हाड पडणार हे निश्चितपणे सांगतो, असा धमकीवजा इशारा सर्वच वृत्त वाहिन्यांच्या मालकांना वंचित बहूजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून आपली मुलाखत मीडियामध्ये काटछाट करून दाखवली असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याचे गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा त्यांनी सर्वच वृत्तवाहिन्यांच्या मालकांना दिला.

वंचित बहुजन आघाडीने ही युती आम्ही विचारपूर्वक केलेली आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहे. माझ्या बोलण्याने चर्चा या घडतच राहणार आहे. टिव्ही वरच्या चर्चेला मी फारसे महत्व देत नाही. परंतु, सध्या मीडिया फार उथळपणे वागत आहे. मी सगळ्या टिव्ही चॅनेलला सांगू इच्छितो की जर सरकार बदलले तर या मीडियाच्या मालकांना फार अडचणीचे ठरणार आहे. कारण चुकीच्या पद्धतीने राजकरणात ट्विस्ट करण्यासाठी काटछाट करून आमचं मत दाखवलं जात आहे.

सध्या आमची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे. महविकास आघाडीमध्ये घेऊन जायचं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला या आघाडीमध्ये घेऊन यायचे हे काम उद्धव ठाकरे हे करणार आहेत. त्यामुळे त्यासदर्भातील जे काही आहे ते उद्धव ठाकरे पाहून घेतील, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच आगामी काळात भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित बहुजन अशा सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. सगळे एकत्र आले तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्या सोबत आले नाही तर शिवसेना आणि वंचित मिळून १५० चा आकडा पार करेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube