…त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळ ऐकू येईल, झाकीर हुसैन यांना राज ठाकरेंची आदरांजली

  • Written By: Published:
…त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळ ऐकू येईल, झाकीर हुसैन यांना राज ठाकरेंची आदरांजली

Raj Thackeray On Zakir Hussain Death : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांना सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Zakir Hussain) त्यावर कला, साहित्य, राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही ट्विट, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहिलं उत्पन्न ५ रुपये, नंतर मिळवली जगभरात ख्याती.. उस्ताद झाकीर हुसैन यांची यशस्वी वाटचाल

जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील ‘तालयोगी’ होते असं मला नेहमी वाटत राहिलं.
असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले.
असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच.
वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, ‘शक्ती’ बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली.
प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल.
उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube