नांदेडला आता तीन खासदार, चव्हाणांसोबत राज्यसभेवर जाणारे गोपछडे नेमके कोण?

नांदेडला आता तीन खासदार, चव्हाणांसोबत राज्यसभेवर जाणारे गोपछडे नेमके कोण?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारांची (Rajya Sabha Election) घोषणा केली. काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेचं तिकीट दिलं आहे.

भाजपाच्या यादीवर नजर टाकली तर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं तिकीट फायनलच होतं. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पण विधानसभा निवडणुकीत डावलल्याने काहीशा नाराज झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचं राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आलं. परंतु, तिसरं नाव सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. ते म्हणजे डॉ. अजित गोपछडे. गोपछडे नेमके कोण आहेत? कुणाच्याही चर्चेत नसताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी मिळाली? याची माहिती घेऊ.

राज्यसभेसाठी भाजपाकडून ज्या नावांची चर्चा सुरू होती त्यात अजित गोपछडे यांचे नाव नव्हते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांच्या नावांची चर्चा होती. परंतु, यापैकी कुणालाच तिकीट मिळालं नाही. तर संघाच्या मुशीत तयार झालेले डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली. 

राज्यसभेसाठी 9 नेत्यांची नावे दिल्लीत, पंकजा मुंडेंना संधी मिळणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव. गोपछडे कुटुंब शैक्षणिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. डॉ. गोपथछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडमधील यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुढे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

महाविद्यालयात असतानाच त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही ते सक्रिय राहिले. नांदेडला आल्यानंतर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरू केले. सध्या डॉ. अजित गोपछडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. डॉ. गोपछडे त्यांच्या पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.

भाजपाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही गोपछडे यांनी काम पाहिले आहे. नांदेड लोकसभा आणि विधानसभेसाठी त्यांचे नाव नेहमीच घेतले जायचे. पण पुढे त्यांना भाजपाने विधानपरिषदेची संधी दिली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही डॉ. गोपछडे यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनात कारसेवेतही अजित गोपछडे यांचा पुढाकार होता.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी अन् अजित गोपछडे होणार खासदार! भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

नांदेडला सध्या प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपाचे खासदार आहेत. नांदेड जिल्ह्यात तीन आमदार भाजपचे आहेत. तर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण हे सुद्धा नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांनाही भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे असे एकाच वेळी एकूण तीन खासदार मिळणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजप उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लवकर जाहीर होत नव्हती. आज अखेर ही यादी जाहीर करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज