रतन टाटा : टाटा ग्रुपचे आधारस्तंभ ते समस्त देशाला अभिमान वाटावे असे उद्योगपती
Ratan Tata : जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे आधारस्तंभ रतन टाटा यांचं आज निधन झालं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. देशाच्या जडणघडणीत टाटा समुहाचं सुरुवातीपासूनच मोठं योगदान राहिलं. रतन टाटा यांनीही आपल्या कुटुंबाचा हा वारसा पुढे चालवला.
देशातील कोट्यावधी नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम टाटांनी केलं. कोट्यावधी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिलं. विकसित भारताच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे त्यात टाटा उद्योग समुहाचाही मोठा वाटा आहे. आज याच परिवारातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांचा जीवनप्रवास नेमका कसा होता याची माहिती घेऊ या..
1937 मध्ये रतन टाटांचा जन्म
देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.
Tata Steel पासून सुरुवात
रतन टाटा यांचा जन्म नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या घरी झाला होता. रतन टाटा लहान असतानाच त्यांचे माता पिता विभक्त झाले होते. त्यामुळे आजीनेच रतन टाटांचा सांभाळ केला. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर 1959 मध्ये रतन टाटांनी आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलं. नंतर अमेरिकेतली कॉर्नेल युनिव्हर्सिटीत गेले. यानंतर 1962 मध्ये भारतात परतले. येथे आल्यानंतर रतन टाटांनी टाटा स्टील कंपनीतून उद्योगविश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला रतन टाटा यांनी कर्मचारी म्हणूनच कामाला सुरुवात केली होती.
1991 मध्ये मिळाली टाटा समुहाची कमान
रतन टाटा 21 वर्षांचे असतानाच त्यांना टाटा समुहाचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आलं. यानंतर टाटांनीही आपली जबाबदारी ओळखत अथक परिश्रम केले. उद्योग समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी 2012 पर्यंत टाटा समूहाचं नेतृत्व केलं. 1996 मध्ये टाटा यांनी टाटा टेली सर्विसेस ही टेलिकॉम कंपनी स्थापन केली. 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) कंपनीला मार्केटमध्ये लिस्ट केले. भारत सरकारने पद्मभूषण (2000) आणि पद्म विभूषण (2008) या पुरस्कारांनी रतन टाटांचा गौरव केला.
रतन टाटा यांच्या काही खास गोष्टी..
रतन टाटा यांच्यासाठी काम म्हणजे पूजा करणे हाच अर्थ होता. त्यांचं म्हणणं होतं की एखादं काम तेव्हाच चांगलं होईल ज्यावेळी तुम्ही त्या कामाचा आदर कराल.
रतन टाटांचा शांत आणि संयमी स्वभाव हीच त्यांची खासियत होती. कंपनीतील अगदी लहानातील लहान कर्मचाऱ्याशीही ते अगदी प्रेमाने भेटत असत. कर्मचाऱ्यांच्या गरजा काय आहेत याची माहिती घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
रतन टाटा म्हणायचे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर ते काम तुम्ही एकट्यानं सुरू केलं असेल आणि ते काम तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर लोकांची मदत नक्की घ्या.
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रतन टाटा नेहमीच तत्पर असायचे. त्यांचे ट्रस्ट विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देत असते. अशा विद्यार्थ्यांना JN Tata Endowment, Sir Ratan Tata Scholarship आणि Tata Scholarship च्या माध्यमातून मदत केली जाते.
विमान उडवणं आवडीचा छंद
रतन टाटा अतिशय साधं जीवन जगत होते. परंतु, त्यांनी काही छंदही होते. पियानो वाजविण्याचा त्यांचा आवडता छंद होता. विमान उडवणे देखील त्यांनी नेहमीच आवडत असे. टाटा सन्समधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आता बाकीचं आयुष्य मी माझे छंद पूर्ण करण्यात व्यतीत करणार आहे. मी आता पियानो वाजविणार आणि विमान चालविण्याचा माझा छंद पूर्ण करणार असे रतन टाटा म्हणाले होते.