नगराध्यक्षांना हटवण्यासाठी सभापती राम शिंदेंकडून पदाचा गैरवापर; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar on Ram Shinde for Karjat Nagar Panchyat President motion of no confidence : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यातील वाद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी पुढे येत असतो. यावेळी कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. नगराध्यक्षांना हटवण्यासाठी शिंदेंनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. असा गंभीर आरोप पवारांनी केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी राम शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माळी समाजाचे आहेत. तरी देखील ते माझ्यासोबत आहेत. ते राम शिंदे यांना आवडत नाही. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून धुंदीत असणाऱ्या परंतु संविधानिक पदाचा विसर पडलेल्या सभापती महोदयांनी चक्क आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केला आहे.
Buldhana News : दोन गटांत राडा; भाजपा युवा तालुका अध्यक्षासह 6 जण गंभीर जखमी
त्यांनी प्रचलित असणारा कायदा बदलण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच चक्क आठवड्याच्या आतच बदल करून हा नियमच बदलून घेतला आणि एकूण सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश पेक्षा कमी नसतील अशा सदस्यांच्या बहुमताने विशेष सभेमध्ये संमत केलेल्या ठरावाद्वारे नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याची तरतूद केली आहे. हे सर्व एक नगरपंचायत त्यांना मिळावी यासाठी राजकारण केलं जात आहे. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, माझा आवाज दाबण्यासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेचे आमदार केलं त्यानंतर सभापती केलं आहे. तर अजित पवारांच्या कर्जत जामखेड दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अजित पवारांच्या स्वागताला गेलेले कार्यकर्त्यांच्या हातात एक पत्र आहे, त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी मंजूर करण्यात आला होता त्याची मागणी करण्यासाठी मतदार संघातील प्रश्न आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी कार्यकर्ते भेटले आहेत. असं रोहित पवार म्हणाले.