रोहित पवारांची कुस्ती स्पर्धा अडचणीत…. सहभागी 20 पहिलवानांवर कारवाई

Rohit Pawar : काही महिन्यांपूर्वी नगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. वादग्रस्त कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली. तर आता पुन्हा एकदा अहिल्यानगराच्या (Ahilyanagar) मातीत कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. मात्र ही स्पर्धा देखील सुरु होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. जिल्ह्यातील कर्जत शहरात 26 ते 30 मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 66 व्या वरिष्ठ गादी / माती राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे (Maharashtra Kesari Competition) आयोजन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम क्रमांकावरील 20 पहिलवानांवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ कारवाई करणार आहे. पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे 9 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्ह्याची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत सहभागी झालेल्या मल्लांतून अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. निवड चाचणीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विविध वजनी गटांतील गादी विभागाचे दहा व माती विभागातून दहा पहिलवान निवडण्यात आले होते. आता या खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने 10 मार्च रोजी जिल्हा कुस्तीगीर संघास 66 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धा बोगस असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांची यादी सादर करण्यात सांगितले होते. यानुसार जिल्हा कुस्तीगीर संघाने निवड चाचणीत सहभागी झालेल्या वीस मल्लांची यादी राज्य कुस्तीगीर संघास सादर केली आहे.
मोठी बातमी! विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर
न भूतो न भविष्य अशी स्पर्धा होणार : रोहित पवार
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जतमध्ये पहिल्यांदाच 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती भरवण्यात येत आहे. कुस्तीच्या स्पर्धेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवर आली असून ती आम्ही पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडू आणि ‘महाराष्ट्र केसरी’च्या इतिहासात न भूतो न भविष्यती अशा प्रकारे हे स्पर्धा यशस्वी होण्याचा प्रयत्न करु तसेच राज्यभरातील सुमारे नऊशेहून अधिक मल्ल या स्पर्धाला उपस्थित राहतील आणि कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही आयोजकांच्या वतीने देण्यात आली.