अधिकृत पत्र विरुद्ध व्हायरल पत्र; अक्षय कर्डिले यांना तिकीट, पण सुजय विखेंच्या नावाने पसरली अफवा

एक पत्र वेगाने व्हायरल झाले, ज्यामध्ये माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिल्याचा दावा करण्यात आला होता.

  • Written By: Published:
Untitled Design 9

Rumors spread about Sujay Vikhe’s name : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्य निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यात एकाच वेळी बारामती आणि राहुरी या दोन महत्वाच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूका होत असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा त्यांच्या कुटुंबाकडेच राहणार असल्याचे संकेत देत भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात पक्षाकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून त्यामध्ये उमेदवारीबाबतची सर्व माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डीले कुटुंबीयांची पकड कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.

मात्र, या अधिकृत घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अचानक खळबळ उडाली, ती एका व्हायरल पत्रामुळे. सोशल मीडियावर एक पत्र वेगाने व्हायरल झाले, ज्यामध्ये माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. हे पत्र पाहताच कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.

प्रवास झाला आणखी महाग! टोल दरवाढीचा फटका, फास्टॅगशिवाय पर्याय नाही; डिजिटल पेमेंट अनिवार्य

मात्र, या व्हायरल पत्राची पडताळणी केल्यानंतर हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या पत्रावर Gemini AI चा लोगो आढळून आला, ज्यावरून हे पत्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला. इतकंच नव्हे, तर पात्रातील अनेक व्याकरणाच्या चुका, मांडणीतील विसंगती आणि अधिकृत पत्रामध्ये असणाऱ्या आवश्यक तपशिलाचा अभाव यामुळे हे पत्र फेक असल्याचे स्पष्ट झाले.

याउलट भाजपकडून जारी करण्यात आलेल्या अक्षय कर्डीले यांच्या उमेदवारीच्या अधिकृत पत्रात सर्व आवश्यक बाबी, जसे की पक्षाचे अधिकृत लेटरहेड, दिनांक, स्वाक्षऱ्या आणि व्यवस्थित मांडणी स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे दोन्ही पत्रांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो. या संपूर्ण घटनेमुळे एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे, तो म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पसरवली जाणारी चुकीची माहिती आणि अफवा.

एका बनावट पत्रामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होणे, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणे आणि राजकीय वातावरण ढवळून निघणे, ही बाब गंभीर मानली जात आहे. सध्या या प्रकरणानंतर भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, अधिकृत माहिती फक्त पक्षाच्या अधिकृत माध्यमांवरूनच घ्यावी आणि अशा फेक पत्रांवर विश्वास ठेवू नये. तसेच, या प्रकारामागे नेमकं कोण आहे याबाबतही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, राहुरी पोटनिवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असून, आता खरी लढत केवळ मतपेटीतच नाही, तर सोशल मीडियावरही रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.

follow us