Sadabhau Khot : दाणे संपले… पाखरं उडून गेली! उरलो एकटाच… असे का म्हणाले!
पुणे : जोंधळ्याच्या ताटव्याला जशी पाखरं दाणे खाण्यासाठी येतात. मात्र, दाणे संपलं की पाखरं उडून जातात. अगदी तसेच माझं मंत्रीपद गेल्यावर माझी गत झाली. सगळी पाखरं उडून गेली अन मी एकटाच उरलो. तेव्हा कळाले की कौतुक हे माणसाला फसवत असते. त्यामुळे बाबाहो हा कौतुकाचा वर्षाव आहे तो तुमच्यासाठी आहे की त्या दाण्यासाठी आहे, हे आपल्याला ओळखणे फार गरजेचे आहे, अशी खंत माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद असताना आणि मंत्रीपद गेल्यावर काय झाले, याची आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. सदाभाऊ म्हणाले की, येणारा प्रत्येक जण माझं एवढं कौतुक करायचा की, एवढी खातीरदारी करणारा तुमच्यासारखा मंत्री पाहिला नाही, असे सांगायचा. त्यामुळे आनंद वाटायचा, मी हुरळून जायचो. मात्र, जसं माझं मंत्रीपद गेलं. तसे सगळेच गेले अन उरलो फक्त मी एकटाच.
मी जेव्हा मंत्री होतो, तेव्हा गर्दी वाढली. घराच्या आजूबाजूला एक किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागायच्या. त्या गर्दीला काय हवं नको ते पाहायचो. त्यासाठी पीए वाढवले. त्यातून येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घ्यायचो. त्यांना सुरुवातीला चहा द्यायचो. मग लोकं म्हणू लागली तुमच्याकडे आले की एक माणूस उपाशी जात नाही. मग नाष्ठा सुरू केला. मग अजून कौतुक केल्यावर मी भाकरी सुरु केली. कारण कौतुकाचा वर्षाव तुम्हाला प्रोत्साहन देत असतो. तसा तो फसवतही असतो. मात्र, तुम्हाला हे ओळखता आले पाहिजे. हा जो कौतुकाचा वर्षाव आहे तो तुमच्यासाठी आहे की त्या दाण्यासाठी आहे, हे ओळखता आले पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.