Video : ..तर हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते,पण.. संजय राऊतांचा खळबळजनक दावा काय?

Sanjay Raut Book : नरकातील स्वर्ग या खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची जोरदारर चर्चा आहे. आजच त्याचं प्रकाशन होत आहे. या पुस्तकात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. (Raut) राऊत यांनी पडद्यामागच्या अनेक घडामोडींवर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकातील आणखी एक गौप्यस्फोट समोर आला आहे. तो म्हणजे हसन मुश्रीफ हे ठाकरे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. पण त्यांचा धर्म आड आल्याने त्यांची गृहमंत्रीपदाची संधी हुकली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी पुस्तकात केलाय.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडं जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्याचा विचार होईल, असं मला वाटलं नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी. जयंत पाटील यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी नकोच होती. तो एक थँकलेस जॉब आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
शाहांना ईडीचा बांबू लावला तर शिवसेनेत येतील; संजय राऊतांनी सांगितली भाजपची स्ट्रॅटेजी
त्याचबरोबर वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु, मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केलं जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेलेल कार्यकर्ते, पण शेवटी धर्म आडवा आला, असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
गृहमंत्री कोण? या प्रश्नावर एकदा शरद पवार म्हणाले, विदर्भातला नवा प्रयोग करून पाहू या. तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख. देशमुखांनी गृहखाते उत्तम सांभाळले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते होते. पण तीन प्रमुख पक्षात बदल्या, बढत्या आणि नेमणुकांच्या कटकटी असतात. त्या देशमुखांच्या वाट्याला आल्या. देशमुख हे नागपूरचे. त्या आधी फडणवीस हेच नागपूरचे सत्ताकेंद्र होते. देशमुख गृहमंत्री होताच सर्व काही बदलले. देशमुखांचा नागपूर-विदर्भातील वाढता प्रभाव, गृहखात्याचे वलय, त्यांना मिळणारे सॅल्यूट हे जुन्या सत्ताकेंद्रास सहन झाले नाहीत आणि तेथूनच देशमुखांच्या रस्त्याचे काटे निर्माण होऊ लागेल असंही राऊत म्हणालेत.