सगळे सापडले, पण कृष्णा आंधळे पोलीसांना दमवतोय… लपून राहण्यासाठी काय करतो?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे (Vishnu Chate) हे सापडले होते. मग सिद्धार्थ सोनवणेला (Siddharth Sonawane) अटक झाली. 31 डिसेंबर रोजी 20 दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) सीआयडीला शरण आला. पाठोपाठ फरार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पोलिसांनी पुण्यातून उचललं. पण नववा आरोपी पोलिसांना अजूनही दमवतोय. कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाही. अखेर त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आलं आहे. त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कृष्णा सापडत नाहीये ही पहिलीच वेळ नाही. 2023 पासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. जेमतेम 27 वर्षांचा हा पोरगा दीड वर्षांपासून सापडत नाही हीच तपास यंत्रणांसाठी शरमेची बाब आहे. (Sarpanch Santosh Deshmukh murder case main accused Krishna Andhale has been declared wanted)
पण हाती न लागण्यासाठी कृष्णा नेमकं असं करतो तरी काय? त्याचा इतिहास काय आहे?
संतोष देशमुख यहत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. सगळ्यांची रवानगी टप्प्या टप्प्याने न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मुख्य आरोपींपैकी आता बाहेर आहे केवळ कृष्णा आंधळे.
मुळचा बीडच्या केज तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवासी असलेल्या कृष्णा आंधळेची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. अवघ्या 22 व्या वर्षीच त्याचे गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण झाले. 2020 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. 2023 मध्ये धारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम 307 म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासूनच तो फरार होता म्हणा किंवा पोलिसांनी पकडण्याची तसदी घेतली नव्हती. कृष्णावर आंबाजोगाई आणि केज अशा पोलिस ठाण्यातही मारामारी, खंडणी, दमदाटी असे विविध गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुले याच्यासोबत त्याचा जवळचा संबंध आहे आणि या जोडीने अनेक गुन्हे एकत्र केले आहेत.
संतोष देशमुख हत्याकांड: सांगळे, आंधळे, घुले गुजरातला कसे गेले ? कुठे-कुठे लपले, कुणी मदत केली?
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारा हाच कृष्णा आंधळे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एस आय टी आणि सीआयडीची पथक, दीडशे पेक्षा जास्त पोलीस तपास करत करत आहेत. पण तरीही कृष्ण आंधळे अद्याप सापडत नाही. नेमका तो गेला कुठे असा प्रश्न कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे एकत्रच पळून गेले. सुरूवातीला भिवंडीला गेले. पण तिथे मदत न मिळाल्याने गुजरात गाठले. तिथे गिरनारच्या मंदिरात राहिले.
पैसे संपल्यावर कृष्णाला पैसे आणण्यासाठी खाली पाठवले. तेव्हा कृष्णा तिथून गेला तो गेलाच. खालच्या खालीच कृष्णा पसार झाला. एकत्र राहिलो तर खर्च वाढतो, सापडण्याची रिस्क जास्त या गोष्टी त्याला उमगल्या आणि त्याने साथीदारांची साथ सोडली. तिथून कृष्णा कुठे गेला याबाबत तपास यंत्रणा अद्यापही बुचकाळ्यात आहेत. नुकतीच नाशिकमध्ये कृष्णा दिसल्याची अफवा पसरली होती. उपनगर पोलिसांनी मग सगळी मंदीर छान मारली, सीसीटीव्ही तपासले, हॉटेल पालथी घातली, पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही. तो प्रयागराजमध्ये महाकुंभमध्येही गेल्याचे बोलले जाते.
Suresh Dhas : आका म्हणाले, पकडू नका; धसांनी जुनं खून प्रकरण उकरून काढत टाकला नवा बॉम्ब
मागच्या दीड वर्षांपासून फरार असल्याने लपून राहण्याचा कृष्णाकडे पूर्वानुभव आहे. माध्यमांमधील बातम्यांनुसार, तो घरच्यांशी तो संपर्क करतच नाही. भूक लागली तरी चहा आणि बिस्किटवर दिवस ढकलू शकतो. त्यामुळे पैसे पुरवून वापरले जातात. फरार असताना सुदर्शन घुलेला दाढी, मिशी कापण्याचा सल्ला कृष्णानेच दिला होता. त्यामुळे कृष्णा पोलिसांच्या हाती लागणे अवघड बनत चालले आहे. आता कृष्णा आंधळेला बीड पोलिसांनी वॉंटेड म्हणून घोषित केलं आहे. त्याचा ठावठिकाणा कोणास माहित असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास तात्काळ बीड पोलिसांना संपर्क साधण्याचा आवाहन केलं आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे.