गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी भरभरून दान; तीन दिवसांतच सुमारे आठ कोटींची देणगी

Shirdi : 28 जुलै ते ३० जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत 7 कोटी 81 लाख 13 हजार रुपयांची देणगी साईचरणी अर्पण झाली असल्याची माहिती शिर्डी साईसंस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

  • Written By: Published:
Saibaba

Shirdi Saibaba Donation : गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनाला लाखो भाविक आले होते. या भाविकांनी साईच्या झोळीत भरभरून दान दिले आहे. 28 जुलै ते ३० जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत 7 कोटी 81 लाख 13 हजार रुपयांची देणगी साईचरणी अर्पण झाली असल्याची माहिती शिर्डी साईसंस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

या देणगीमध्‍ये रोख स्‍वरुपात 2 कोटी 4 लाख दक्षिणा पेटीत प्राप्‍त झालीय आहेत. देणगी काऊंटरवर 1 कोटी 25 लाख रुपये देणगी मिळाली आहे. पीआरओ देणगी 87 लाख, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2 कोटी 7 लाख रुपये, परकीय चलनाद्वारे 5 लाख 65 हजार रुपये मिळाले आहेत. तर सोने 1,125.570 ग्रॅम प्राप्‍त झाले आहे. त्याची किंमत 1 कोटी 46 लाख 74 हजार 544 व चांदी 2 376.500 ग्रॅम प्राप्‍त झाली आहे. तिची किंमत 3 लाख 90 हजार 649 रुपये इतकी आहे.


तीन लाख भाविकांनी शिर्डी दुमदुमली

श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणत 3 लाखांहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 94 हजार 825 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्‍नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. दर्शन रांगेत 1 लाख 65 हजार 200 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत 71 लाख 07 हजार 360 रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले.

उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍त निवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साई आश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या 39 पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

follow us