मिस्टर फडणवीस भूतकाळ कशाला उकरता…, वर्तमान पाहा; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ टीकेवर राऊतांचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

  • Written By: Published:
Sanjay Raut

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरावे. पंतप्रधान मोदींनी मराठवाड्याचा दौरा करावा आणि केंद्राने पुरेसा निधी द्यावा तसेच, एकरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता संजय राऊतांनी पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, हे भाजपवाल्यांचं मूर्खासारखं बोलणं आहे. त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली की, ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का? कोविडमध्ये महाराष्ट्राइतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे आत्ताच्या पोपटांना कळले पाहिजे. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यात जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती, तिथे कोविड काळात अनागोंदी अराजक माजला. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, ती गंगा कोविडमध्ये बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगाने पाहिलेले आहे असा टोला राऊतांनी लगावाल आहे.

मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पाहा त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करा. भारतीय जनता पक्षाचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की, ते स्वीकारत नाही. लडाखमध्ये दंगल झाली तर दुसऱ्यावर दोष दिला. तुमची आश्वासन तुम्ही पूर्ण केले नाही. तुम्ही वांगचूकला कशाला अटक करतात? खोटं बोलायचं हे भाजपचं कायमचं धोरण आहे. हा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. तीन-चार वर्षापूर्वी कोविडमध्ये काय झाले हा नाही. हे लोक कुठून उत्खनन करून असे विषय काढतात हे मला माहित नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर! CM फडणवीसांनी केंद्राकडे तातडीची मदत मागितली, पत्र पाठवलं

फडणवीस मुख्यमंत्री किंवा मंत्री असतील. पण, आम्ही सुद्धा काहीतरी आहोत. आम्हालाही काय आहे ते माहित आहे. पीएम केअर फंडमध्ये किती पैसे आहेत? हे फडणवीसांना माहित आहेत का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली आणि मुंबईतील फार्मा कंपन्यांनी किती लाख कोटी दिले हे माहिती आहे का? देवेंद्रजींना माहीत नसेल तर मी आकडा देतो. तेच पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागितले तर तुम्ही मागचं उकरतात. ही कुठले धोरण तुम्ही आणलेले आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काही झालं की 1950 सालाचं काढायचं. 1940 सालाचं काढायचं. अरे तुम्ही तुमचे बोला. तुम्ही शेण खात आहात ते बोला. आता तुम्ही शेण खात आहात. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारकडे पाहा. पंजाब सरकारचे कार्य बघा. त्यांनी पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. त्यांनी वाहून गेलेले प्रत्येक घर बांधून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आणलेली आहे.

परंतु, तुम्ही महाराष्ट्रात काय करताय तर चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे होते. त्याआधी शरद पवार होते. त्याआधी वसंतराव नाईक होते. त्याआधी यशवंतराव चव्हाण होते, असे म्हणत हे 1948 सालापर्यंत जातील. देवेंद्र फडणवीस राज्य करण्याची ही पद्धत नाही. आधी राज्य करायला शिका. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचे राजकारण नाही. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. तुमचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सांगा. आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. तुम्ही वर्तमान काळात बोला. भूतकाळ कशाला उकरून काढत आहात, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.

follow us