संजय राऊतांकडून आरोग्य विभागाचे ‘पोस्टमार्टेम’ : तानाजी सावंतांवर 10 महाभयंकर भ्रष्टाराचाराचे आरोप

संजय राऊतांकडून आरोग्य विभागाचे ‘पोस्टमार्टेम’ : तानाजी सावंतांवर 10 महाभयंकर भ्रष्टाराचाराचे आरोप

मुंबई : राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो, असा मोठा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawanr) यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना १० मुद्द्यांमध्ये सविस्तर पत्र लिहून राऊत यांनी त्यांना यात लक्ष देण्याची आणि चौकशी करण्याची विनंती केली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) MP Sanjay Raut has accused Health Minister Tanaji Sawant of corruption)

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो असे बोलले जाते. यामुळे संपूर्ण खात्यात असंतोष आहे व त्याचा फटका गरीबांना बसत आहे.

Mumbai : अजितदादांचा आयुक्तांना फोन, अधिकाऱ्यांना खडसावलं; नेमकं काय घडलं?

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत व हा सगळाच प्रकार गंभीर तसेच राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे. नियमबाह्य बढत्या व बदल्या हा एक मोठा उद्योग आरोग्य विभागात बनला असून या उद्योगाचे ‘संचालक’ संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

कृपया पुढील बाबींकडे गांभीर्याने पहावे-

१) महाराष्ट्रातील एकूण १२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ‘समावेशन’ करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख असे एकूण साधारण ५० कोटी रुपये जमा केले व हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास ओएसडीची नियुक्ती करण्यात आली.

२) अत्यंत गंभीर बाब अशी की, सध्या महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड १ लाख रुपये घेतले जातात. याचा अर्थ या योजनेत बोगस लाभार्थीची भरमार असून खोटी बिले, खोटे रुग्ण यावर कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जात आहेत.

३) आरोग्य खाते जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या खात्याची दोन्ही संचालकपदे रिक्त ठेवली असून त्याचा ‘लिलाव’ पद्धतीने सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे.

४) भ्रष्टाचार व सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खाते पूर्णपणे सडले आहे. ३४ पैकी १२ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती दिली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे.

मुंडे भावा-बहिणीचे मनोमीलन झाले… पण पंकजांसाठीचा रोडमॅप भाजपने आधीच ठरवलाय!

५) वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांत ‘सीएस’ कॅडर नसलेल्या दोघांना सिव्हिल सर्जन म्हणून नियुक्ती दिली. यामागे झालेल्या अर्थकारणाचा आकडा मुडद्यांनाही धक्का देणारा आहे.

६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १४ उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे ‘नियुक्ती’साठी प्रत्येकी ५० लाखांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना एकजात साईड पोस्टिंग मुंबई-पुण्यात दिल्या. त्यांच्याकडे पोस्टिंगसाठी पैशांची मागणी आजही सुरू आहे.
नाशिक, लातूर येथे राज्य लोकसेवा आयोगाचे ‘उपसंचालक’ असताना ५०-५० लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना ‘पदे’ दिली.
छत्रपती संभाजीनगर, अकोला येथील पदे रिक्त ठेवली. एमपीएससीचे ‘उपसंचालक’ असतानाही ही पदे रिक्त ठेवण्यामागे पैशांची लालसा हेच कारण आहे. आरोग्य खात्यात लिलाव पद्धतीने अशा बदल्या – बढत्या पदस्थापना व्हाव्यात हे या राज्याचे दुर्दैव आहे.

७) डॉ. प्रतापसिंह सारणीकर हे जिल्हा आरोग्य अधिकारी या यादीत १११ क्रमांकावर आहेत. उपसंचालक यादीत त्यांचे नाव नाही तरी त्यांना दोन टप्पे ओलांडून सहसंचालकपदी नियुक्ती करणे हे धक्कादायक तसेच यामागे अर्थकारण आहे याचा पुरावा आहे.

८) आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार कोणत्या थराला गेलाय याचे उत्तम उदाहरण म्हणून जळगाव प्रकरणाकडे पाहता येईल. २०२० च्या ‘कोविड’ खरेदीत अनियमितता आहे म्हणून डॉ. नागोराव चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव) यांना निलंबित करण्यात आले, परंतु त्याच खरेदी व्यवहारातील १८ कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनीस वितरित करण्यासाठी मंत्र्यांकडून दबाव आला व ३ वर्षांनंतर त्यास आता प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या व्यवहारातील ८ कोटी रुपये कात्रज मुक्कामी पोहोचवण्यात आले.

९) गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या. पैशांची मागणी करण्यासाठी व पैसे जमा करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली असून सर्व पैसे संबंधित मंत्रीमहोदयांच्या कात्रज येथील खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जातात.

१०) आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, खासकरून महात्मा ज्योतीराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी. याबाबत गृहमंत्रालयानेही निर्देश दिल्याची माझी माहिती आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा. त्याच्या हाती पुरावे सुपूर्द करण्यास मला आनंदच होईल. आरोग्य खात्यातील या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. गृहमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे निर्देश दिलेच आहेत. त्या चौकशीला गती मिळावी व राज्याची आरोग्य यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टेम व्हावे ही विनंती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज