सहा खासदार फुटले, आता संजय राऊतांच्या मांडीला-मांडी लावून बसलेला खासदार देखील फुटणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का देत पक्षाचे सहा लोकसभा खासदार आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
Six MPs met under ‘Operation Tiger’ : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर प्रत्यक्षात आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का देत पक्षाचे सहा लोकसभा खासदार आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी या सहा खासदारांसह एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी या खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर केले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा स्वतंत्र गट लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दीना पाटील यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. मात्र या सहा खासदारांपुरतीच ही राजकीय घडामोड मर्यादित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण आता आणखी एका खासदाराच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा संभाव्य सातवा खासदार बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता.
मी पुण्यातच आहे; ओमराजे निंबाळकरांनी दिल्लीतील बैठकींच्या चर्चांना पूर्णविराम दिला, पण राजकीय भूमिका गुलदस्त्यात
सहा खासदारांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या चार जणांपैकी एक खासदार काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात जाण्यास तयार झाला होता. तब्बल तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत त्याने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळी काही अडचणी निर्माण झाल्याने ऑपरेशन टायगरची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. आता सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर देखील संबंधित खासदाराने तात्काळ शिंदे गटात जाण्यास नकार दिला असला तरी येत्या दोन महिन्यांत तो देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडू शकतो, असा दावा शिंदे गटातील सूत्रांकडून केला जात आहे.
सुरुवातीला सातवा खासदार म्हणून राजाभाऊ वाजे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, राजाभाऊ वाजे या संपूर्ण घडामोडींचा भाग नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता संशयाची सुई अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्याकडे वळली आहे. ठाकरे गटातील हे दोन्ही नेते पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी मानले जातात. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणत्याही एका नेत्याने शिंदे गटात प्रवेश केल्यास तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ संख्याबळाचा नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठा धक्का ठरू शकतो.
चर्चांना कंटाळलो, जे व्हायचं असेल ते होईल; पाटील आणि आष्टीकर शिंदेंच्या गळाला कसे लागले?
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडे एकूण नऊ खासदार होते. त्यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश होता. आता यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे ठाकरे गटाचे लोकसभेतील संख्याबळ मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आणखी एखादा खासदार ठाकरे गटाला रामराम ठोकणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.