शिंदे, पवारांना दिलेल्या ताकदीने भाजपचा कार्यकर्ता नाखूश? फडणवीस-बावनकुळे देणार कानमंत्र
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील आव्हानांवर मात करण्यासाठी भाजपने (BJP) येत्या 18 ऑगस्ट रोजी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात ही बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मार्गदर्शन करणार आहेत. येत्या मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभा आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. (state BJP has convened a meeting of MLAs on August 18)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता त्यांनी 48 पैकी 48 जागांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यात भाजपचा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत असणार आहे. या बैठकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. आम्ही लोकसभेच्या 48 जागा आणि 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आमचे काम सुरू केले आहे. आमच्या आघाडीच्या भागीदारांमध्ये कोण, कोणत्या जागेवर निवडणूक लढवायची याचा विचार न करता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
News click Funding : संसदेत येताचं राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल; कॉंग्रेसला चीनकडून फंडिंगचा आरोप
राजकीय जाणकारांच्या मते, 2014 आणि 2019 मधील निवडणुकांमध्ये मोदी फॅक्टर विनिंग ठरला असला तरीही यंदा निवडणुकीतील आव्हाने स्वीकारण्यासाठी स्वतःची संघटना मजबूत करावी लागणार आहे. याच कारण मागील चार वर्षांमध्ये बदलेलं महाराष्ट्राचं राजकारण. आधी तुटलेली भाजप-शिवसेना युती, त्यानंतर अस्तित्वात आलेलं महाविकास आघाडी सरकार असं राजकारण मागील वर्षापर्यंत सुरु होतं. त्यानंतर गेल्या एका वर्षात भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
अमित शहांनी राज्यसभेत मांडले दिल्ली सेवा विधेयक, ‘इंडिया’ची परीक्षा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आहे. तसंच आगामी निवडणुकाही एकत्र लढविण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बोलताना सांगितलं की, “भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील मतभेद मिटवण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. तळागाळात एकजूट नसेल तर ठरवलेल्या उद्दिष्टाला हरताळ फासला जाईल, अशी भीतीही या पदाधिकाऱ्याने बोलताना व्यक्त केली आहे.
शिंदे अन् पवारांना दिलेल्या ताकदीमुळे भाजपचा पदाधिकारी नाराज?
भाजपच्या पदाधिकाऱ्याने बोलून दाखविलेल्या चिंतेमागील प्रमुख कारण म्हणजे 106 आमदार असूनही तिन्ही पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये घेतलेली धाकट्या भावाची भूमिका. 106 आमदारांसह सरकारमध्ये केवळ नऊ मंत्री असल्याने पक्षाचे कार्यकर्ते फारसे खूश नाहीत. 40 आमदारांसह शिंदे गट आणि 36 पेक्षा अधिक आमदारांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ कॅबिनेट मंत्र्यांचा समान वाटा आहे. यामुळे भाजपच्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर उर्जा मिळावी, कार्यकर्त्यांना कानमंत्र मिळावा यासाठी फडणवीस यांचे संबोधन महत्वाचे असणार आहे.