विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान

राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक राखडल्यामुळे विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या.

  • Written By: Published:
Untitled Design 48 1

The battle for the Legislative Council elections : राज्यातील आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या राजकारणाला वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकांमध्ये नागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रिक्त केलेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक राखडल्यामुळे विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या, संबंधित मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देखील निवडणूका घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्तच होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये आवश्यक असलेली किमान 75 टक्के मतदारसंख्या उपलब्ध झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.

राज्य विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 इतकी आहे. यामध्ये 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडली जातात. याशिवाय 30 सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात, 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून, 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात, तर 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

या निवडणुकांसाठीचा अधिकृत कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. 25 मे रोजी अधिसूचना जारी होणार असून, 1 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. 2 जून रोजी अर्जाची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडेल आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

उत्तर प्रदेश हादरलं! कामासाठी निघालेल्या मजुरांच्या मॅजिक व्हॅनचा भीषण अपघात; 9 जणांचा दुर्दैवी अंत

या निवडणुकीत सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील सध्याच्या संख्ख्याबळाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभेत सध्या महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येते, भाजपकडे 131 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 57, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय काही लहान पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा धरल्यास महायुतीचे एकूण संख्याबळ 234 वर पोहोचत.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 20 असे एकूण 49 आमदार आहेत. समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि इतर काही लहान पक्षांचा पाठिंबा माविआकडे असल्याचे मानले जाते. सध्या विधानसभेतील एकूण आमदारसंख्या 286 इतकी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुका केवळ विधान परिषदेतील जाग भरण्यासाठी महत्वाच्या नाहीत, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आणि राज्यातील बदलते राजकीय समीकरण यांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

follow us