योगेश्वरी देवीच्या साक्षीने पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी
पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (Beed) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून मोठी घोषणा केली आहे. भविष्याच्या योजनेप्रमाणे बीड जिल्ह्यात सहाही आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत, असं मंत्री मुंडे यांनी म्हटलं आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई येथे उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महायुतीमधील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिल्याचं मानलं जात आहे. पंकजाताई आल्या तर आमचं काय, अशी भीती माझ्याबाबत असेल तर त्या दिवशी राजकारण संपून जाईल. पण ताई नसतील तर आमचं काय, हे महत्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या.
आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आणले होते. आता तर म्हणते आम्ही सहाला सहा आणले आहेत. आमची सध्या खिचडी आहे, युती आहे. एवढी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. माझं स्वप्न तुमच्यासाठी, गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नासाठी आहे, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, भविष्याच्या योजनेप्रमाणे बीड जिल्ह्यात सहाही आमदार आणि खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा, यासाठीच्या रणनीतीची सुरुवात आम्ही आज योगेश्वरी देवीच्या साक्षीने करत आहोत.
आपल्या यश येईल, अपयश येईल, हे तुमच्यावर आणि ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून मी सुरुवात करत आहे असंही त्या म्हणाल्या. मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली तर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही, असा अनुभव मला आजपर्यंत कधीही आलेला नाही, असं सांगून पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना एक रोड मॅप दिल्याचं मानले जात आहे. या घोषणेमुळे मात्र महायुतीमध्ये भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनाही एक प्रकारचा हा इशारा असल्याचं मानलं जात आहे.