वाशिष्ठी नदीच्या डोहात मोठी दुर्घटना; मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू

Ratnagiri District News : रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथील दुर्देवी घटना समोर आली आहे. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. (District) आठ वर्षीय लक्ष्मण कदम नदीच्या डोहात आंघोळ करत होता. त्यावेळी तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम आणि आत्या रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाशिष्ठी नदीचा डोह १२ ते १४ फूट खोल आहे.
चिपळूण येथील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीत लता कदम आणि रेणुका शिंदे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लता कदम यांचा आठ वर्षांचा मुलगाही होता. दोन्ही महिला कपडे धुत असताना लक्ष्मण आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी तो बुडू लागला.
अखेर नागरिकांच्या आंदोलनाला यश; मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला २ दिवसांची स्थगिती
लता कदम यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु, हे दोघे बुडू लागले. हा प्रकार रेणुका शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनीही पाण्यात उडी घेतली. परंतु, त्या डोहात तिघांचा बुडून मृत्यू झाला. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले तिघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नदीत दुर्घटना घडल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तिघांच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरु केले. नदीच्या डोहातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यापूर्वीच तिघांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले होते. या प्रकरणाची नोंद शिरगाव पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर खडपोली रामवाडी गावात शोककळा पसरली. मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.