ग्राहकांना मोफत पाणी द्यावंच लागणार! तुकाराम मुंढेंचा हॉटेल्स-रेस्टॉरंट्सना कडक इशारा, नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
Tukaram Mundhe’s stern warning to hotels and restaurants : राज्यातील हॉटेल्स, रेस्टोरंटस, धाबे आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना मोफत आणि सुरक्षित पिण्याचं पाणी देणं आता बंधनकारक करण्यात आलं असून त्याबाबतचा फलक देखील हॉटेलमध्ये लावावा लागणार आहे.
राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टोरंटस, धाबे, इटरीज आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील तुकाराम मुंढे यांनी दिला.
ग्राहकांना पिण्यायोग्य पाणी सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणं प्रत्येक हॉटेल आणि रेस्टोरंटसाठी बंधनकारक असेल. याबाबतचा स्पष्ट फलक दर्शनी भागात लावावा लागणार आहे. ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाण्याची मागणी केल्यास ते विकत येईल. अन्यथा मोफत सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणं आवश्यक राहणार आहे. तसेच ग्राहकांसाठी हँडवॉश, साबण, टॉवेल आणि स्वच्छताविषयक मूलभूत सुविधा ठेवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी! विधानसभेत आव्हाडांचा खळबळजनक दावा
एफडीएने किचन आणि अन्न साठवणुकीसाठी देखील काही महत्वाचे निकष निश्चित केले आहेत. किचनच्या भिंती आणि फ्लोअर वॉशेबल टाइल्सचे असावेत, पाणी झिरपू नये, पुरेशी हवा खेळती राहावी आणि एक्झॉस्टची व्यवस्था असावी. कच्चा माल, शिजवलेले अन्न, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांच्यासाठी स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक फ्लाय फ्लॅप, नियमित पेस्ट कंट्रोल आणि किडे, झुरळे, पाल किंवा उंदरापासून मुक्त वातावरण राखणं बंधनकारक असेल.
तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. अस्वच्छ वातावरणात अन्न तयार करणं, वारंवार वापरलेल्या तेलाचा वापर, निकृष्ट दर्जाचं पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन अशा बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबवण्यात येत असून सुरक्षा मानके आणि नोंदणीचे सर्व नियम पाळणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे.
पासपोर्ट सेवा दिनी केंद्राचा मोठा खुलासा; पासपोर्ट हा केवळ प्रवासाचा दस्तऐवज, नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्याची चर्चा पावसाळी अधिवेशनात देखील झाली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रॅग माफियांनी 250 कोटी रुपयांचं लॉबिंग केल्याचा गंभीर आरोप केला. मात्र या आरोपांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगत तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
एकीकडे भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नाविरोधात एफडीएने मोहीम छेडली असताना, दुसरीकडे हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांसाठी कडक नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील खाद्य व्यवसायांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या निकषांबाबत अधिक सतर्क राहावं लागणार आहे.